खळबळजनक घटना! कातळपाडा येथे तरुणाची गळा आवळून हत्या

उसने दिलेले पैसे देण्याघेण्यावरून वाद

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यातील कातळपाडा येथील इसमाचा गळा दाबून हत्या करण्यात आली. उसने दिलेले पैसे देण्या घेण्यावरून हा वाद झाला असून या गुन्ह्यातील दोघांना पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. ही घटना कातळपाडा येथे बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,अमित प्रफुल्ल वाघ (37) रा. कातळपाडा असे या मयताचे नाव आहे. अमितने कोपरी-कुर्डूस येथील व्यक्तींकडून उसने पैसे घेतले होते. ती रक्कम परत दिली नाही. त्याचा राग धरून चंद्रकांत म्हात्रे आणि अक्षय म्हात्रे यांनी अमित वाघ याच्या घरी रात्री जाऊन उसने दिलेल्या पैशाची मागणी केली. त्यावेळी वाघ आणि म्हात्रे यांच्यात शाब्दीक वाद झाला. हा वाद विकोपाला पोहचला. त्या दोघांनी शिवीगाळी करीत हाताबुक्क्याने व लाथेने मारहाण केली. त्यानंतर त्याला घरातून बाहेर पडवीमध्ये खेचत आणले. त्यानंतर चंद्रकांत याने अमितची मान दाबली. अक्षयने अमितच्या गुप्त भागावर लाथ मारून पुन्हा त्याला मारहाण केली. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. ही घटना कातळपाडा येथे अमित वाघ याच्या घरात रात्री पावणे बाराच्या दरम्यान घडली. झालेल्या दुखापतमध्ये अमितचा मृत्यू झाला. या घटनेनंतर दोघेही पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोयनाड पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्यांचा शोध सुरू केला.अखेर गुरुवारी सायंकाळच्या दरम्यान त्यांना पकडण्यास यश आले. याप्रकरणी खून करणार्‍या चंद्राकांत म्हात्रे व अक्षय म्हात्रे यांच्याविरोधात पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या दोघांनाही अटक केल्याची माहिती समोर येत आहे.

Exit mobile version