। रोहा । प्रतिनिधी ।
भरधाव वेगाने मोटार सायकल घेऊन जाणाऱ्या तरुणाने एका मागुन एक धारदार चाकूने सपासप वार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या धारदार चाकू हल्ल्यात पती- पत्नीसह गावातील अन्य एक जण जखमी झाल्याची घटना रोहा तालुक्यातील चणेरा भागातील खारखर्डी पारंगखार गावात घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेतील दोन्ही आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुरुड तालुक्यातील चोरडे परिसरातील सावरोली- वेताळवाडी येथील अविनाश मंगेश शेळके व गीतेश घाणेकर हे दोन आरोपी मित्र शनिवारी (दि.21) सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास आपल्या ताब्यातील यामाहा एमटी 15 या मोटार सायकलवरून पारंगखार – खारखर्डी येथील तक्रारदार मनोहर गुंडे यांच्या घराजवळून भरधाव वेगाने जात होते. यावेळी त्यांची पत्नी मयुरी गुंडे यांनी हळू जा असे सांगितले असता या गोष्टीचा मनात राग धरून आरोपी अविनाश शेळके याने त्याच्या जवळ असलेल्या धारदार लोखंडी सुरा काढून मनोहर गुंडे यांच्या खांद्यावर व डावे हाताचे पंजा जवळ वार करुन त्यांना जखमी केले. त्यानंतर रागाचा पारा चढलेल्या त्या आरोपी तरुणाने मयुरी गुंडे या महिलेच्या डोक्यात व उजव्या हातावर वार केले. चाकू घेऊन धिंगाणा घालणाऱ्या व सपासप वार करणाऱ्या तरुणाला रोखण्यासाठी व सदरचे भांडण सोडवण्यासाठी गावातील आलेला राकेश भोईर याच्या हाताचे कोपऱ्यावर सुरा मारून त्याला देखील जखमी केले. त्यानंतर आरोपी गीतेश घाणेकर याने हाता बुक्क्याने मारहाण करुन शिवीगाळी व दमदाटी करुन मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात मनोहर गुंडे यांनी तक्रार दाखल केली असून, पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नरेश मोरे अधिक तपास करित आहेत.







