। माणगाव । वार्ताहर ।
माणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीस सक्त मजूरीची शिक्षा माणगाव सत्र न्यायालयाने सुनावली आहे.
अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार जुलै 2019 रोजी माणगाव पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली होती. या गुन्ह्याच्या तपासाअंती आरोपीने पीडित मुलीला मध्य प्रदेश येथील त्याच्या मूळ गावी पळवून नेण्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले होते. आरोपी व पीडित मुलीला या ठिकाणी जाऊन ताब्यात घेतले असता पिडीत मुलीने तिच्या इच्छे विरुद्ध आरोपीने शारीरिक संबंध ठेवल्याचे पोलिसांना सांगितले. यावरून माणगाव पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला.
या खटल्याची सुनावणी मा. विशेष न्यायालय माणगाव येथे झाली. यावेळी मा. विशेष सत्र न्यायाधीश हर्षल भालेराव यांनी या घटनेतील गुन्ह्यांच्या शाबितीनंतर आरोपी नेताराम पुराणलाल चौधरी यास दोषी ठरवून विविध कलमांनुसार दि.22 जुलै रोजी 20 वर्षे सक्त मजुरी व रुपये 50,000/- दंड व दंड न भरल्यास 3 महिने साधा करावास, 10 वर्षे सक्त मजुरी व रुपये 50,000/- दंड व दंड न भरल्यास 3 महिने साधा करावास, 5 वर्षे सक्त मजुरी व रुपये 25,000 /- दंड व दंड न भरल्यास 2 महिने साधा करावासासह पोस्को कलम 4 अन्वये 20 वर्षे सक्त मजुरी व रु 50,000/- दंड व दंड न भरल्यास 3 महिने साधा करावास. पॉक्सो कलम 6 अन्वये 20 वर्ष सक्त मजुरी व रुपये 50,000 दंड व दंड न भरल्यास 3 महिने सध्या करावासाची शिक्षा ठोठावली.