। अकोला । प्रतिनिधी ।
अकोला-पातुर राज्य महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. मालवाहू वाहन आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला. या अपघातात मालवाहू वाहन रस्त्यावरील डिवाइडरला धडकून पलटी झाले. त्यामुळे मालवाहू वाहनासह वाहनातील वाहून येणाऱ्या वस्तूंचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अकोलामधील पातुर-अकोला राज्य महामार्गावरील हिंगणा फाटा येथे मंगळवारी (दि. 03) हा भीषण अपघात झाला. अकोल्याकडून वाशीमकडे एक मालवाहू चारचाकी कलर पेंट घेऊन जात होती. त्याचवेळी समोरून चुकीच्या दिशेने वेगात येणाऱ्या दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात मालवाहू चारचाकी वाहनचालकाचे नियंत्रण सुटून गाडी दुभाजकावर आदळली आणि पलटी झाली. गाडी पलटी झाल्याने वाहनातील कलर पेंट रस्त्यावर पडून मोठे नुकसान झाले असून चालक जखमी झाला आहे. तर, दुचाकी चारचाकीवर धडकल्याने दुचाकीचाही भीषण अपघात झाला. या धडकेत दुचाकीस्वार सुधीर मनोहर टाले यांचा मृत्यू झाला. तर, चारचाकी चालक गंभीर जखमी झाला. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.







