ड्रग्ज प्रकरणी दादा भुसेंवर गंभीर आरोप; काय म्हणाले संजय राऊत..

। मुंबई । वृत्तसंस्था ।

ड्रग्ज माफिया ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील याचा नाशिकमध्ये कारखाना होता. या कारखान्यातून पोलिसांनी 300 कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले होते. हा कारखाना पालकमंत्र्यांच्या आशीर्वादाशिवाय चालू शकत नाही. त्यामुळे याप्रकरणात शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.

यावेळी संजय राऊत यांनी ललित पाटील प्रकरणावरुन दादा भुसे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ललित पाटील याला शिंदे गटातील एका मंत्र्याने ससून रुग्णालयातून पळून जायला मदत केली, असा आरोप आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी ललित पाटील आणि दादा भुसे यांच्यातील कनेक्शनसंदर्भात भाष्य केले आहे. या सगळ्यांकडे पुरावे असल्याशिवाय ते अशाप्रकारचा आरोप करणार नाहीत. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस याप्रकरणाची चौकशी करणार आहेत का, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपी ललित पाटील याची ससून रुग्णालयामध्ये बडदास्त ठेवण्यासाठी शिंदे गटातील एका मंत्र्याने अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना फोन केला. त्यामुळे या प्रकरणामध्ये शिंदे गटातील मंत्री सहभागी असल्याचा आरोप कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी मंगळवारी केला. या प्रकरणात अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्यासह येथील डॉक्टर दोषी असून, यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, अशी मागणीही धंगेकर यांनी केली.

त्यामुळे दादा भुसे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे. पालकमंत्र्यांच्या आदेशाशिवाय हा कारखाना चालू शकत नाही. या ड्रग्जच्या पैशातून दादा भुसे यांना मोठी आर्थिक मदत मिळाली का? ललित पाटील प्रकरणात दादा भुसे यांचा संबंध काय? आतापर्यंत ललित पाटीलने दादा भुसे यांना किती खोके दिले? त्याबदल्यात दादा भुसे ड्रग्जच्या कारखान्याला संरक्षण पुरवत होते का, अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केली.

Exit mobile version