धान्य वितरण सेवा खंडित
। कोर्लई । वार्ताहर ।
मागील महिन्याच्या पंधरवड्यापासून सर्व्हर डाऊनमुळे रास्त भाव धान्य वितरण सेवा वारंवार खंडित होत असून, याचा रास्त भाव धान्य दुकानदार व शिधापत्रिकाधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. सर्व्हर सेवा लवकरात लवकर पूर्ववत व सुरळीत मिळावी, अशी मागणी रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गिरीश साळी यांनी तहसीलदार रोहन शिंदे यांच्याशी चर्चा करताना केली. यावेळी तालुक्यातील सर्व रास्त भाव धान्य दुकानदार उपस्थित होते.
जुलै महिन्याच्या 18 तारखेपासून तालुक्यात रास्त भाव धान्य वितरणात पॉज मशीन वारंवार बंद पडत असल्याने धान्य वाटपात अडचणी येत असून, यामुळे शिधापत्रिकाधारकांना तासन्तास ताटकळत उभे राहावे लागते आहे. वेळप्रसंगी पावतीसाठी नंबर जवळ आला असता सर्व्हर डाऊनमुळे मशीन बंद पडल्यास मशीन सुरू होईपर्यंत नाही तर दुसर्या दिवशी पुन्हा रांगेत उभे राहावे लागत असल्याने नाराजीचा सूर दिसून येत आहे. याचा रास्त भाव धान्य दुकानदार व शिधापत्रिकाधारकांना त्रास होत असल्याने तालुका रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गिरीश साळी यांनी सर्व रास्त भाव धान्य दुकानदारांसमवेत तहसीलदार यांची भेट घेऊन सर्व्हर सेवा लवकरात लवकर पूर्ववत व सुरळीत मिळावी, अशी मागणी केली.