केंद्रप्रमुख श्‍वेता म्हात्रेंचे कार्य दिशादर्शक- शेडगे

| खरोशी | वार्ताहर |

केंद्रप्रमुख श्‍वेता चंद्रकांत म्हात्रे यांनी केंद्रप्रमुखपदी कार्यरत असताना अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले असून, त्यांचे कार्य पुढच्या पिढीला नेहमीच दिशादर्शक राहतील, असे गौरवोद्गार रायगड जिल्हा परिषदेचे उपशिक्षण अधिकारी संतोष शेडगे यांनी श्‍वेता म्हात्रे यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमप्रसंगी काढले. ते पुढे म्हणाले की, शिक्षण विभागाच्या वेगवेगळ्या योजना आपल्या शाळांपर्यंत पोहोचवण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

वरसई, आंबेघर केंद्राच्या केंद्रप्रमुखा श्‍वेता म्हात्रे यांचा सेवापूर्ती सोहळा नुकताच एजी फार्म हाऊस, पेण येथे पार पडला. या कार्यक्रमासाठी पेण पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी अरुणादेवी मोरे, जिल्हा परिषद शिक्षण विभाग कक्ष अधिकारी संजय कवित्के, अखिल भारतीय शिक्षक संघाचे कोकण अध्यक्ष प्रमोद पाटील, सेवानिवृत्त संघटनेचे जिल्हाचिटणीस अमरचंद पाटील, शिक्षक भारती संघटनेचे कोकण प्रांत अध्यक्ष ज.स. म्हात्रे, शिक्षक नेते जगदीश म्हात्रे, शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष महेंद्र गायकवाड, पेण प्राथमिक शिक्षक पतपेढीचे संचालक मोहन भोईर, विठोबा पाटील, कैलास भोईर, आजी-माजी केंद्रप्रमुख व गागोदेव आंबेघर केंद्रातील शिक्षक वर्ग आदिसह शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी केंद्रातील शिक्षकांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष सावंत यांनी केले.

Exit mobile version