ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे अपघाताचा धोका
| नागोठणे | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला नागोठण्यात सध्या वेग आला आहे. नागोठणे शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या तिन्ही उड्डाण पुलांचे काम जोरात सुरू आहे. मात्र, असे असतानाच महामार्ग चौपदरीकरण कामाचे ठेकेदार असलेल्या कल्याण टोल प्लाझाच्या अधिकाऱ्यांकडून काही महत्त्वाच्या ठिकाणी सर्व्हिस रोडवर गतिरोधक न उभारल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे हे गतिरोधक उभारण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व महामार्गाचे ठेकेदार एखाद्या अपघाताची वाट पाहात आहेत का, असा प्रश्न वाहनचालक व स्थानिक नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या नागोठणे शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या महामार्गावरील नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्र ते मुरावाडी फाटा या सुमारे दोन किलोमीटरच्या अंतरातील नागोठणे विभाग सहकारी भातगिरणीसमोरील उड्डाण पूल, नागोठणे रेल्वे स्थानकासमोरील उड्डाण पूल तसेच येथील नागोठणे सर्व्हिस सेंटरच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपापासून ते मुरावाडी फाटा उड्डाण पूल या तिन्ही उड्डाण पुलांचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. या पुलांचे काम करताना पुलाच्या दोन्ही बाजूचे सर्व्हिस रोड सुरु करण्यात आले आहेत. मात्र, काही ठिकाणी गतिरोधकाची गरज असताना त्याठिकाणी गतिरोधक उभारण्यात आलेले नसल्याने अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
महामार्गावरील नागोठणे विभाग सहकारी भातगिरणी या ठिकाणी असलेल्या सर्व्हिस रोडवरून मुंबई बाजूकडून महाड बाजूकडे जाणारी सर्वच वाहने भरधाव वेगाने जात आहेत. यामध्ये अवजड वाहनांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे नागोठण्यातून वाकण, पाली व ग्रामीण भागात जाण्यासाठी येणारे स्थानिक वाहन चालक येथील पुलाखालूनच सर्व्हिस रोडवर येत असल्याने त्यांचे थोडे जरी दुर्लक्ष झाल्यास मुंबईकडून भरधाव येणाऱ्या वाहनांपासून त्यांना अपघाताचा धोका निर्माण झाल्याने या सर्व्हिस रोडवर गतिरोधकाची नितांत गरज निर्माण झाली आहे. याशिवाय महाड बाजूकडून मुंबईकडे जाणारी वाहने येथील स्टेट बँक समोरील सर्व्हिस रोडवरून मुंबईकडे भरधाव वेगाने जात आहेत. त्यामुळे नागोठण्यातील खडक आळीमार्गे या महामार्गावर येणाऱ्या वाहन चालकांनाही अपघाताचा धोका निर्माण झाल्याने याठिकाणीही गतिरोधक उभारण्याची गरज आहे. तसेच नागोठण्यातील इतरही काही ठिकाणी सर्व्हिस रोडवर गतिरोधक उभारण्याची मागणी होत असल्याने महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व ठेकेदार कल्याण टोल प्लाझाच्या अधिकाऱ्यांकडून आवश्यक त्या ठिकाणी तातडीने गतिरोधक उभारावेत, अशी मागणी होत आहे.







