मुरुड शहरांमध्ये शिवस्मारक उभारा

पद्मदुर्ग शिवस्मारक संघटनेची मागणी

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड बाजारपेठ येथे असलेल्या पोलीस चौकी जवळील नगरपरिषदेच्या जागेत राजे शिवछत्रपती महाराजांच्या शिवस्मारक उभा व्हावा याकरिता मुरुड तालुका पद्मदुर्ग शिवस्मारक संघटनेने मुरुड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांना रितसर निवेदन देण्यात आले . यावेळी पद्मदुर्ग शिवस्मारक संघटना शिवप्रेमी – प्रकाश चव्हाण, कुणाल सतविडकर, आदेश दांडेकर, स्वप्निल कवळे, जगन पुलेकर, किर्ती शहा, विजय सुर्वे, उमेश भोईर , ॲड. रूपेश पाटील आदी शिवप्रेमी उपस्थित होते.

रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुका हा एक ऐतिहासिक वारसा लाभलेला तालुका असुन मुरुड शहराच्या सागरी किनारा पट्टीवर असलेला किल्ले पद्मदुर्ग हा छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. या शहराच्या अपुर्ण राहिलेली इच्छा असुन या शहराच्या मध्यभागी जर शिवस्मारक स्थापन झाले तर त्यामुळे केवळ शहराच्या सौंदर्यात भर पडणार नसुन कित्येक शिवप्रेमीच्या मनातील वर्षानुवर्षे अपुर्ण राहिलेली इच्छा पूर्ण होणार आहे. मुरुड शहराचे जवळ असलेल्या अलिबाग, रोहा या ठिकाणी असलेल्या शिवस्मारकांमुळे तेथील जनतेला राजे शिवछत्रपती महाराज आपल्या सदैव सोबत आहेत याची जाणीव त्यांना भासते. त्या शहरांप्रमाणेच आपल्या मुरुड शहरामध्ये ही शिवछत्रपती महाराजांचे स्मारक असावे व आमचे दैवत आपल्या सोबत कायम आहेत याकरिता अशा स्वरूपाचे स्मारक शहराच्या मध्यभागी मुख्य बाजारपेठेत येथे असलेल्या पोलीस चौकीजवळील मुरुड नगरपरिषदेच्या मालकीच्या जागेमध्ये उभारण्यात यावे अशी मागणी निवेदनात केली आहे.

मुरुड तालुका पद्मदुर्ग शिवस्मारक संघटनचे शिवप्रेमी यांनी आमच्या प्रतिनिधीनीशी बोलताना म्हणाले की, मुरुड तालुक्याची ऐतिहासिक नगरी मुरुड शहर आहे. शहरातील बाजारपेठेतील भागात राजे शिवछत्रपती महाराजांचा शिवस्मारक कुठे ही नाही आहे. शिवस्मारक व्हावा ही तालुक्यातील शिवप्रेमीसह मराठी नागरिकांची इच्छा आहे. नगरपरिषदमध्ये काही वर्षांपूर्वी नगरसेवकांनी शिवस्मारक बाजारपेठेत व्हावा हा प्रस्ताव आणला होता. त्यावेळी मंजुरी मिळाली होती. परंतु शिवस्मारक झाले नाही, अशी खंत मुरुड तालुका पद्मदुर्ग शिवस्मारक संघटनने बोलून दाखवली आहे.

Exit mobile version