। नवीन पनवेल। प्रतिनिधी ।
रूम खरेदीधारकांनी खरेदी केलेले रूम न देता आणि रक्कम परत न करता वार्षिक व्याज परताव्याचे आमिष दाखवले आणि सात कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी अधिराज कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक निकुंज गुप्ता, ब्रिजभूषण गुप्ता आणि कुंजबिहारी गुप्ता यांच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात 26 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरज गुरव हे खारघर सेक्टर 21 येथे राहत असून, त्यांनी अधिराज कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या रोहिंजण येथील साईटची पाहणी केली. त्यांनी 43 व्या माळ्यावरील दोन रूमची खरेदी करण्याचे ठरवले. त्यांनी बुकिंग रक्कम 27 लाख 59 हजार चेक द्वारे दिली आणि दोन रूम बुक केले. त्यानंतर वेळोवेळी त्यांनी 1 कोटी 49 लाख इतकी रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर केली आणि त्याच्या पावत्या त्यांना मिळाल्या. काही दिवसांनी त्यांना रूम खरेदी धारक हे त्यांना कंपनीला देणे असलेल्या भविष्यातील हप्त्यासाठी आगाऊ पैसे भरू शकता आणि आगाऊ कालावधीत त्या रकमेवर नऊ टक्के वार्षिक व्याज मिळवू शकतात अशा प्रकारची योजना असल्याची माहिती देण्यात आली. इतर रूम खरेदी धारक यांनी या ठिकाणी रूम खरेदीची रक्कम अदा केलेली आहे. तसेच अनेकांनी नऊ टक्के वार्षिक व्याज मिळवण्याच्या योजनेत पैसे भरले. मनीष कुमार, के व्ही.चरणतेज, परमानंद जैन, अनिल पुजारी, भरत झुंजारे, मनोज मल्होत्रा, आदित्य अपूर्वा, सौरभ नायर यांनी या योजनेत पैसे गुंतवले. आठ जणांनी 7 कोटी 29 लाख 578 एवढी रक्कम अधिराज कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या नावे असलेल्या बँक खात्यावर पाठवली. मात्र, रूम दिले नाहीत आणि गुंतवणूक केलेली मूळ रक्कम परत केली नाही तसेच वार्षिक व्याज परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक केली.






