फणसाड अभयारण्यात सात शिकारी गजाआड; न्यायालयाकडून तीन दिवसांची कोठडी

। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरुड तालुक्यामधील फणसाड अभयारण्यात वन्यजीवांची शिकार करण्यासाठी आलेल्या सात जणांना पकडण्यात आले आहे. या सर्वांना मुरुड येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता, त्यांना तीन दिवसांची फॉरेस्ट कोठडी देण्यात आली आहे.
रात्रीच्या वेळी वन्यजीवांची शिकार करण्याच्या बेताने दि. 24 जून रोजी मंगेश विष्णू वाघमारे (25), सोमनाथ गजानन वाघमारे (23) दोघे राहणार उसरोली-बेलीवाडी, मच्छिंद्र दशरथ वाघमारे (26) रा. सुमरादेवी, दीपक मनोज पाटील (18), प्रथमेश प्रकाश ठाकूर (21) दोघे रा. शिरगाव, चेतन भास्कर खानावकर (25) व प्रज्ज्वल हेमंत रोटकर (22) हे दोघेही राहणार साळाव हे आले होते. शिकारीसाठी आलेल्या या लोकांना टेहळणी करताना फणसाड अभयारण्य प्रशासनातील कर्मचारी वृंदांनी पकडले असता त्यांच्याकडून तीन मोटारसायकल, दोन ठासणीच्या बंदुका, जिवंत दारुगोळा, तीन बॅटर्‍या, पाच मोबाईल अशा वस्तू ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत.
या सातही जणांची कसून चौकशी केली असता आपण शिकार करण्यासाठी आलो होतो, अशी कबुली दिली. दरम्यान, ठाणे विभागाच्या उपवनसंरक्षक सरोज गवस व सहाय्य्क वनसंरक्षक नंदकुमार कुप्ते यांच्या मार्गदर्शनाखाली फणसाड अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार काळभोर व मुरुड येथील फणसाड अभयारण्यातील कर्मचारी वृंदांनी त्यांना पकडण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, याबाबतचा अधिक तपास फणसाड प्रशासन करीत आहे.

Exit mobile version