| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
आग्नेय दिल्लीतील जैतपूर पोलीस स्टेशन परिसरात शनिवारी (दि. 09) मोठी दुर्घटना घडली आहे. सकाळी 9.30 च्या सुमारास, समाधीस्थळाची 100 फूट लांबीची भिंत अचानक कोसळली. ज्यामुळे जवळच्या अनेक झोपडपट्टया त्याच्या विळख्यात आल्या. ढिगाऱ्याखालून 8 जणांना वाचवण्यात आले. त्यांना एम्स ट्रॉमा सेंटर आणि सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान 7 जणांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलीस, अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या टीम घटनास्थळी तैनात आहेत. झोपडपट्ट्यांमध्ये आणि भिंतीखाली आणखी कोणी गाडले आहे का याचा शोध घेतला जात आहे. मृतांमध्ये तीन पुरुष, दोन महिला आणि दोन मुलींचा समावेश आहे. सर्वांची ओळख पटली असून मुत्तू अली (45), रबीबुल (30), शबीबुल (30), रुबिना (25), डॉली (25), रुखसाना (6) आणि हसीना (7)अशी मृतांची नावे आहेत. जखमी हिसबुलवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शनिवारी (दि. 09) सकाळी साडेनऊच्या सुमारास हरी नगर गावाच्या मागे असलेल्या झोपडपट्टीवर समाधीस्थळाची भिंत कोसळल्याने हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस 5 ते 7 मिनिटांत घटनास्थळी पोहोचले. लोकांच्या मदतीने आणि जेसीबी बोलावून लोकांना तेथून बाहेर काढण्यात आले. त्यांना दोन वेगवेगळ्या रुग्णालयात पाठवण्यात आले. इतर विभागांचे पथकही घटनास्थळी पोहोचली आहेत.






