महाडमध्ये सात वाड्यांना पाणी टंचाईच्या झळा

| महाड । प्रतिनिधी ।

करोडो रुपयांच्या योजना राबवल्या गेल्या असल्या तरी महाड तालुक्यातील पाणी टंचाई आजही कायम आहे. औद्योगिक क्षेत्रातील शेल गावातील आदिवासी वाड्यांसह अन्य वाड्यादेखील तहानलेल्याच आहेत. यामुळे आदिवासी वाडीवरील महिलांना खाजगी बोअरवेलवरून पाणी विकत घेण्याची पाळी आली आहे.

तालुक्यातील प्रत्येक गावात जलजीवनच्या करोडो रुपयांच्या योजना राबवल्या गेल्या आहेत. योजनांतून ठेकेदार अधिकारी गब्बर झाले आहेत. मात्र, गोरगरीब जनतेला आजही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. अशीच अवस्था शेल आदिवासी वाडिवरील महिलांची आहे. याठिकाणी सुदर्शन केमिकल कंपनीने आपल्या सी.एस.आर. च्या माध्यमातून पाणी टंचाई दूर करण्यासाठी विहीर, टाकी आणि पाईपलाईन टाकण्याचे काम केले आहे. मात्र, ही योजना ग्रामस्थांना विश्‍वासात न घेता केल्याने सपशेल फोल ठरली असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. शिवाय जलजीवन योजनेतून देखील करोडो रुपये खर्ची घातले आहेत. मात्र या आदिवासी वाडीवर आणि इतर सात वाड्यांवरदेखील अद्याप पाणी पोहोचलेले नाही. आदिवासी वाडीवर पिण्याचे पाणी नसल्याने पंचायत समितीच्या माध्यमातून टँकर सुरू करण्यात आला आहे. हा टँकरदेखील चार दिवसांनी गावात येतो. आदिवासी महिलांना डोक्यावर हांडे घेवून सुमारे एक किमी अंतरावरील एका खाजगी बोअरवेलवरून पाणी आणावे लागत आहे. याकरिता त्यांना प्रती हंड्याला रुपये मोजावे लागत आहेत. पिण्याच्या पाण्याची समस्या अत्यंत गंभीर असल्याने आदिवासी महिलांनी संताप व्यक्त केला आहे.

महाड तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी शासनाने करोडो रुपयांच्या योजना राबवल्या असल्या तरी पिण्याच्या पाण्याची समस्या सुटेल असे चिन्हं दिसत नाहीत. तालुक्यातील शेल आदिवासीवाडीसह अन्य वाडी वस्तीवर ठिकठिकाणी साठवण करण्यासाठी लागणारे पाण्याचे मोठे ड्रम ठेवलेले आहेत. टँकर आल्यानंतर या ड्रममधून पाणी नेण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी होत आहे. गावात असलेल्या विहिरींनी कधीच तळ गाठला आहे. एका विहिरीवरून फक्त घरगुती वापरासाठी लागणारे पाणी मिळते. यामुळे शेल गावातील वाड्याना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. शेल गावाला सुमारे सात वाड्या असून जवळपास एक हजार लोकसंख्या आहे. गावात गेली अनेक वर्षात योजना झाल्या असल्या तरी पाणीटंचाई अद्याप दूर झालेली नाही. यामुळे पाण्याचे हाल सुरू असल्याने पावसाने लवकर हजेरी लावावी अशी याचना ग्रामस्थ करत आहेत. शेल आदिवासी वाडीवरिल योजना ही एका कंपनीने केली असल्याचे गोविंद काळे यांनी सांगितले.

शेल आदिवासी वाडीवर पाण्याचे दुर्भिक्ष कमी व्हावे, अशीच मागणी स्थानिक आदिवासी महिला करत आहेत. शेल आदिवासी वाडीवर कंपनीने पाईप टाकले, मात्र विहिरीत पाणीच नाही. गावातील पाइपलाइनपण वाडीत आलेली नाही म्हणून पाण्यासाठी जवळ असलेल्या खाजगी बोअरवेलवर जावे लागते.

कमल काटेकर, माजी सरपंच शेल
Exit mobile version