| अलिबाग | प्रतिनिधी |
सरत्या वर्षाला निरोप देण्याबरोबरच नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी जिल्ह्यात जोमाने तयारी सुरु झाली आहे. थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर अवैध दारु, वाहतूक, निर्मिती करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी जिल्ह्यात विशेष सात पथकांची नेमणूक केली आहे. त्यात पाच कार्यकारी निरीक्षक पथके व दोन भरारी निरीक्षक पथकांचा समावेश आहे. या पथकाद्वारे दारु विक्री, वाहतूक करणाऱ्यांवर नजर राहणार आहे.
नाताळनंतर 31 डिसेंबर निमित्त रायगड जिल्ह्यात पुन्हा पर्यटकांनी येण्यास सुरुवात केली आहे. वेगवेगळे हॉटेल, कॉटेज फुल्ल झाले आहेत. नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी काही जण मित्रमंडळींसमवेत तर काही जण आपल्या कुटूंबियांसमवेत रायगड जिल्ह्यात दाखल झाले आहेत. गतवर्षीप्रमाणे यंदाही पर्यटकांनी रायगडला पसंती दिली आहे.
जिल्ह्यात दोन हजार पेक्षा अधिक हॉटेल, कॉटेजेस आहेत. 2024 या नव्या वर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबरला थर्टी फर्स्ट साजरा केला जाणार आहे. जिल्ह्यात या कालावधीत बनावट दारूची विक्री करून त्याची बेकायदेशीररित्या वाहतूक करीत असल्याच्या घटना घडत असतात. त्यावर अंकुश ठेवण्यासाठी रायगडच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करण्याची मोहीम सुरु केली आहे. जिल्ह्यात एकूण चार विशेष भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकाद्वारे रात्री बेरात्री महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाणार आहे. बेकायदेशीरित्या गावठी दारुची विक्री, वाहतूक करणारे तसेच दुकानांमध्ये अनधिकृतपणे साठा ठेवून विक्री करणाऱ्यांवर नजर ठेवण्यात येणार आहे. रात्रीची गस्त घालून कारवाई केली जाणार आहे.
रेल्वे स्थानकासह वाहनांची होणार तपासणी
परराज्यातून येणाऱ्या मद्यावर कारवाई करण्यासाठी प्रमुख रेल्वे स्थानकांमध्ये रेल्वे विभागाशी समन्वय साधून संशयित व्यक्तीच्या सामानाची आणि संशयित वाहनांची तपासणी केली जाणार आहे. परराज्यातील मद्य, बनावट मद्य विक्री रोखण्याच्या सूचना पथकांना करण्यात आल्या आहेत.
मालक व जागा मालकांविरोधात होणार गुन्हा
राज्य उत्पादन शुल्क विभागाचा परवाना न घेता, अवैधरित्या मद्य विक्री करणाऱ्या हॉटेल, धाब्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. मालक व जागा मालक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला जाणार आहे.
व्हॉट्सॲपच्या आधारे घेणार नागरिकांची मदत
अवैध मद्य विक्री, निर्मितीवर अंकूश ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने व्हॉट्सॲपचा आधार घेतला आहे. अवैध मद्य विक्री, निर्मितीबाबत 8422001133 या क्रमांक नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आला असून नागरिकांच्या मदतीने संपर्क साधून अवैध दारु विक्री, निर्मितीवर लक्ष ठेवले जाणार आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी फलकदेखील लावण्यात आले आहेत.
परराज्यातील बनावट मद्य जप्त
पनवेलमध्ये बेकायदेशीररित्या परराज्यातील बनावट मद्य तयार करणाऱ्या गोडावूनवर रायगडच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकला. या छाप्यात बनावट स्कॉच निर्मिती व विक्री करणारी टोळी उघडकीस आणण्यास यश आले आहे. त्यांच्याकडून 13 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती रवींद्र कोले यांनी दिली.
जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन
थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात पर्यटक दाखल झाले आहेत. रविवार 31 डिसेंबरला सरत्या वर्षाला निरोप दिला जाणार आहे. या कालावधीत रस्त्यावर वर्दळ वाढण्याबरोबरच जिल्ह्यात गर्दीदेखील होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नव्या वर्षाचे स्वागत आनंदात व खेळीमेळीच्या वातावरणात करावे. कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही,वाहतूक कोंडी होणार नाही कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याचीदेखील काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नववर्षाच्या अनुषंगाने जिल्ह्यात पार्ट्यांचे आयोजन केले जाणार आहे. मद्य विक्रीसाठी एक दिवसाचा परवाना उपलब्ध करण्यात आला आहे. आतापर्यंत 40 ऑनलाईन अर्ज दाखल झाले आहेत. त्यांची पडताळणी करून परवाना दिला जाणार आहे. मात्र, विना परवाना पार्टीचे आयोजन केल्यास त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल.
रवींद्र कोले, अधीक्षक
राज्य उत्पादन शुल्क विभाग, रायगड
एक वाजेपर्यंत राहणार दुकाने खुली थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर मद्य विक्री मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने जिल्ह्यातील मद्य विक्रीच्या दुकानांना पहाटे एक वाजेपर्यंत व पार्ट्यांमध्ये मद्य विक्रीसाठी पहाटे पाच वाजेपर्यंत परवानगी दिली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आली आहे.







