। चिरनेर । प्रतिनिधी ।
पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून पतीने पत्नीला रॉकेल ओतून पेटवून दिले. पत्नीने जाळून घेत आत्महत्या केल्याचा केलेला बनाव प्रत्यक्ष साक्षीदार ठरलेल्या सात वर्षांच्या मुलीनेच उघड केल्याने पलायनाच्या तयारीत असलेल्या पती राम शिरोमणी शाहू या नराधमाला उरण पोलिसांनी अटक केली आहे.
कंटेनर ट्रेलरवर ड्रायव्हर म्हणून काम करणारा राम शिरोमणी शाहू (35) मुळ राहाणार मध्यप्रदेश हा आपली पत्नी जगराणी शाहू (35) आणि सात वर्षांची मुलीबरोबर पागोटे -उरण येथे भाड्याने खोली घेऊन राहात होता. पत्नी जंगराणी हिचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून पतीपत्नीत नेहमीच भांडणे सुरू होती. सोमवारी (दि.25) रात्री पतीपत्नी यांच्यात विवाहबाह्य संबंधांच्या संशयावरून कडाक्याचे भांडण झाले. संशयाचे भुत डोक्यात शिरलेल्या नराधम आरोपीने रागाच्या भरात पत्नीला खोलीत बंद करून तोंडांत बोळा कोंबून हातपाय बांधले. त्यानंतर रॉकेल अंगावर ओतून पेटवून दिले. यामध्ये दुदैवाने पत्नीचा भाजून मृत्यु झाला होता. या दरम्यान आरोपीने पत्नीने स्वतःच जाळून घेत आत्महत्या केल्याचा बनाव पतीने रचला होता. त्यामुळे उरण पोलिसांनी पतीच्या सांगण्यावरून याप्रकरणी अपमृत्यूची तक्रार दाखल केली होती.
मात्र, त्यानंतर आरोपीने आपल्या सात वर्षांच्या मुलीला घेऊन उलवे येथे पलायन केले होते. यामुळे पोलिसांची सुई पतीवर येऊन ठेपली. दरम्यान तपासा
दरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजची तपासणी केली. या फुटेजमध्ये पलायनाच्या तयारीत असलेला आरोपी मुलीसमावेत पागोटे येथे आल्याचे निदर्शनास येताच उरण पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. तपासातही आरोपीने पत्नीने स्वतःच जाळून घेत आत्महत्या केल्याचे सांगितले. मात्र, वडीलांनीच आईला रॉकेल ओतून पेटवून दिल्याची बाब सात वर्षांच्या मुलीने पोलिसांसमोर उघडकीस आणली. पोलिसांसमोरच मुलीने वडीलांचे कुकर्म उघडकीस आणल्यानंतर उरण पोलिसांनी लागलीच आरोपीला बेड्या ठोकल्या. न्यायालयाने आरोपीला सोमवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनिफ मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल काठवाणी करीत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.





