सारा वर्तकचा ऐतिहासिक विक्रम; धरमतर ते गेटवे 36 किमी अंतर नऊ तास बत्तीस मिनिटांत पार
| वाघ्रण | दिपक पाटील |
अलिबाग तालुक्यातील फोफेरी गावची केवळ सात वर्षांच्या सारा अभिजीत वर्तक हिने इतिहास रचत धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया हे तब्बल 32 किमीचे अंतर अवघ्या 9 तास 32 मिनिटांत यशस्वीरित्या पोहून पार केले. समुद्राच्या अथांग लाटा आणि रात्रीचा अंधार असूनही तिने न घाबरता ही सफर यशस्वी केली. खेळण्या-बागडण्याच्या वयात या आव्हानात्मक समुद्री मार्गावर पोहणारी सर्वात लहान जलतरणपटू ठरली असून, तिच्या नावावर आगळावेगळा विक्रम नोंद झाला आहे.
या महान कामगिरीमागे तिचे किशोर पाटील आणि सूरज लोखंडे यांचे अथक प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि मानसिक बळ याचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी सारामध्ये आत्मविश्वास निर्माण करत तिला प्रत्येक आव्हानांवर मात करण्याची ताकद दिली, त्यामुळेच ती यशस्वी ठरल्याचे साराच्या आईवडिलांनी सांगितले.
सारा जेव्हा धरमतर ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत अंतर पोहून पार करीत पोहोचली, तेव्हा तिचे गेट वे ऑफ इंडिया येथे स्वागत करण्यासाठी राजाराम गावंड, अनंत वर्तक, आशा अनंत वर्तक, जितेंद्र वर्तक, उमेश वर्तक, स्वप्निल म्हात्रे, बालनाथ मोकल आणि कुलाबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी, कुटुंबीय व मित्र परिवार उपस्थित होते. समुद्राच्या सतत बदलणाऱ्या प्रवाहांना, वाऱ्याला आणि उंच लाटांना तोंड देत साराने दाखवलेले धैर्य खरोखर प्रेरणादायी आहे. साराच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आईवडिलांना अश्रू अनावर
आपल्या लेकीच्या महान यशाने आईवडील वैष्णवी आणि अभिजीत वर्तक यांना आनंदाश्रु अनावर झाले. लेकीच्या कर्तृत्वाचा अभिमान व्यक्त करताना दोघेही भावूक झाल्याचे पाहावयास मिळाले. मुलीच्या धैर्य आणि चिकाटीचा क्षण प्रत्यक्ष अनुभवताना त्यांचे डोळे पाणावले.
साराच्या मूळ गावी जल्लोष
साराच्या यशाची बातमी तिचे आजोळ असणाऱ्या अलिबाग तालुक्यातील फोफेरी या गावात पोहोचताच कुटुंबियांसह फोफेरी ग्रामस्थांनी आनंदाने एकच जल्लोष केला. यावेळी गावकऱ्यांनी आम्हाला आमच्या सुकन्येचा अभिमान असल्याचे सांगत तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधी करायचेय
आतापर्यंत साराने तालुका, जिल्हा, राज्य तसेच आंतराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन पदके मिळविली आहेत. 2024 मध्ये महाराष्ट्राच्या संघातून भारताचे प्रतिनिधीत्व करताना तीन रौप्य आणि दोन कांस्यपदकांची कमाई केली आहे. साराला ऑलिम्पिक, तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करुन देशासाठी पदक पटकवायचे स्वप्न तिने उराशी बाळगली आहे.









