सात वर्षांच्या साराने रचला इतिहास

खुल्या वयोगटात 30 किमी समुद्र पार; मालपे जेट्टी ते विजयदुर्ग जेट्टी 7 तासांत पूर्ण

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग येथील सात वर्षांची सारा अभिजीत वर्तक हिने शनिवार (दि.15) विजयदुर्ग येथील समुद्री जलतरण स्पर्धेत खुल्या वयोगटामध्ये सहभागी होऊन मालपे जेट्टी ते विजयदुर्ग जेट्टी असा 30 किमीचा समुद्रमार्ग फक्त 7 तासांत पूर्ण करून विक्रम रचला आहे.

तिचा पहिलाच समुद्री पोहण्याचा स्पर्धात्मक प्रयत्न होता, ज्यामध्ये अनेक अनुभवी पोहणारेही उतरायला घाबरतात. जोरदार भरती-ओहोटी, बदलणारे समुद्री प्रवाह आणि सलग अनेक तास पाण्यात पोहण्याचे आव्हान स्वीकारत साराने विलक्षण जिद्द, सहनशक्ती आणि मानसिक ताकद दाखवली. सारा कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी येथे कोच किशोर पाटील, रुग्वेद पाटील आणि सूरज लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेते. तिचे प्रशिक्षक म्हणतात की सारा अत्यंत शिस्तबद्ध, निडर आणि मेहनती असून तिचा हा विक्रम महाराष्ट्रातील तरुण पोहणाऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे.

साराचे आई-वडील वैष्णवी आणि अभिजीत वर्तक यांनी मुलीचा हा पराक्रम पाहताना मोठी भावना व्यक्त केली. सारा नेहमीच जिद्दी आहे, पण तिने इतक्या कठीण समुद्री मार्गावर इतक्या आत्मविश्वासाने विजय मिळवताना पाहणे आमच्यासाठी खूप भावूक करणारे होते, असे त्यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांत साराने जिल्हा, राज्य आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून, तिने अनेक पदके जिंकली आहेत. तिच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे तिच्या प्रति तिची सर्वत्र दखल घेतली जात आहे. 15 नोव्हेंबर 2025 रोजीच्या तिच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर क्रीडा संस्था आणि रायगडमधील स्थानिक नागरिकांनी सारावर अभिनंदनांचा वर्षाव केला आहे. अनेकांनी तिला महाराष्ट्रातील उदयोन्मुख पोहणाऱ्या खेळाडूंपैकी एक म्हणून गौरवले आहे. कठोर परिश्रम, उत्कृष्ट प्रशिक्षण आणि कुटुंबाचे दृढ पाठबळ यामुळे सारा वर्तकचे जलतरणातील भविष्य अत्यंत उज्वल असल्याचे सर्वांनी व्यक्त केले आहे.

Exit mobile version