| कल्याण | प्रतिनिधी |
कल्याण पूर्व विभागातील काकडवाल गावात वीजचोरी शोधमोहीम पथकाला मारहाण करणार्या दूधकर कुटुंबाने तब्बल 17 लाख 68 हजार 780 रुपयांची वीजचोरी केल्याचे उघडकीस आले आहे. दूधकर कुटुंबाने 11 जानेवारीला वीजचोरी शोधमोहिमेतील कार्यकारी अभियंत्यासह दहा अभियंते व कर्मचार्यांना मारहाण केली होती. वीजचोरी केल्याप्रकरणी तिघा दूधकर बंधूंविरुद्ध अंबरनाथ पोलीस ठाण्यात वीज कायदा 2003 च्या कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनंता शनिवार दूधकर, अशोक शनिवार दूधकर आणि प्रकाश शनिवार दूधकर अशी गुन्हा नोंदवण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या तिघांनीही मीटरकडे येणार्या केबलला टॅपिंग करत मीटर टाळून वीजचोरी केल्याचे आढळले. अनंता दूधकर याने 6 लाख 69 हजार 550 रुपयांची 28 हजार 252 युनिट, प्रकाश दूधकर याने 7 लाख 23 हजार 390 रुपयांची 30 हजार 869 युनिट तर अशोक दूधकर याने 3 लाख 57 हजार 840 रुपये किमतीची 13 हजार 211 युनिट वीज चोरून वापरल्याचे पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सहाय्यक अभियंता रवींद्र नाहिदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक श्रीरंग गोसावी करत आहेत.