| खोपोली | संतोषी म्हात्रे |
ईर्शाळवाडीसारखी पुन्हा दुर्घटना घडू नये, यासाठी प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना राबवत असल्याचे खालापूर तालुक्यात पाहावयास मिळत आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खालापुर तालुक्यातील 17 गावे दरडग्रस्त घोषित करीत त्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी यांनी अतिवृष्टीचा पाऊस व आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचा अभ्यास केला असून नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्याची तयारी असताना सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना तशा सूचनाही दिल्या आहेत. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी ही सतर्क राहात सर्व नागरिकांना तत्पर सेवा पुरवावी, असे आवाहनही तहसीलदार आयुब तांबोळी यांनी केले आहे.
खालापूर तालुक्यातील ईर्शाळवाडी येथे गेल्या वर्षी दरड कोसळल्याने मृत्यूचे तांडव पाहावयास मिळले. डोळ्यादेखत आपली आई, मुलगा वडील हे दरडखाली गाडले जात असताना काळीज पिळवटून टाकणारा हा प्रसंग ग्रामस्थांनी पाहिला. या घटनेने संपूर्ण प्रशासन जागे होत त्या ठिकाणी युद्ध पातळीवर उपाययोजना राबविण्यात आल्या. ईर्शाळवाडीत 43 कुटुंब वास्तव्यास होते. यामधील 2 कुटुंब दरड कोसळल्याने उध्वस्त झाले तर 57 बेपत्ता, 27 मृतदेह सापडले होते. या भयाण दुर्घटनेनंतर अनेकांनी हलहल व्यक्त करत दरड कोसळून मृत्युमुखी पावलेल्यांना आदरांजली वाहली. ईर्शाळवाडीतील दुर्घटनेनंतर शासनाने सतर्क राहत दरडग्रस्त गावांना स्थलांतरित केले होते. स्थलांतरित केलेल्या सर्व नागरिकांना शासनाने सोयीसुविधा ही पुरवल्या होत्या.
खालापूर तालुक्यात गतवर्षी 9 गावांचा दरडग्रस्त क्षेत्रात समावेश होता. त्यामध्ये यावर्षी अजून 8 गावांचा समावेश झाला असून तालुक्यातील दरडग्रस्त संख्या 17 वर पोहोचली आहे. खोपोली नगरपरिषद हद्दीतील सुभाषनगरच्या जीएसआयच्या अहवालानुसार यातील काही गावे वर्ग 1 मध्ये असल्याने तेथे सावधगिरी बाळगणे गरजेचे असल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. तर सुभाषनगर, दत्तवाडी, तोंडली, काजूवाडी, ताडवाडी, गारभाट धनगरवाडी, बिडखुर्द, जांबरुंग, चिंचवली गोहे, टेंबेवाडी, जंगमवाडी, चांगवाडी, हाशाची पट्टी, काटवन, ढेबेवाडी-बर्गेवाडी, मुठा (माडप ठाकूरवाडी) व वीरगाव (कुंभीवली ठाकूरवाडी) अशी 17 गावे दरड ग्रस्त म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
सन 2023 ला खोपोली नगरपरिषद हद्दीतील सुभाषनगरचे तात्पुरते स्थलांतर मस्को वर्कर कॉलनी, खोपोली येथे करण्यात आले होते. तालुक्यातील दत्तवाडी येथील लोकांची सोय अनुभविक प्रशिक्षण संस्था नारंगी येथे करण्यात आली होती. काजूवाडी येथील 5 कुटुंबांचे स्थलांतर त्यांच्या नातेवाईकांच्या घरी केले होते.
ताडवाडी येथील दरडप्रवण क्षेत्रातील लोकांचे रायगड जिल्हा परिषद शाळा आंबेवाडी, तर काहींचे चिंचमाळ येथील साई मंदिरात सोय केली होती. गारभाट धनगरवाडी ही खालापूर व कर्जत तालुक्याच्या सीमेवर असून त्यांना जवळचे व सोयीचे ठिकाण माथेरान असल्याने माथेरान येथील त्यांच्या नातेवाईकांच्या घरी सोय करण्यात आली होती. बीडखुर्द व जांबरुंग येथील दरडप्रवण लोकांची सोय अष्टविनायकमधील महड देवस्थानच्या भक्तनिवासात करण्यात आली होती. टेंबेवाडी येथील लोक हनुमान मंदिर टेंबेवाडी, जंगमवाडी यांचे समाज मंदिर, चांगवाडी यांचे समाज मंदिर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, हाशाची पट्टी येथील दोन घरांची सोय कर्जत तालुक्यातील मोहाचीवाडी नेरळ येथे करण्यात आली होती.
दरडग्रस्त गावांचा अभ्यास केला असून तशा सूचनाही गावकरी मंडळींना दिल्या आहेत, त्याचबरोबर सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना अतिवृष्टीच्या काळात सतर्क राहण्याचे आव्हान केले आहे. तर अतिवृष्टीच्या काळात नागरिकांनीही सतर्क रहात कोणतीही गरज भासल्यास तात्काळ प्रशासनाला कळवावे. अतिवृष्टीच्या काळात नागरिकांनी कोणत्याही घटनेकडे दुर्लक्ष करू नये तर त्या घटनेची माहिती प्रशासनाला कळवत आपणही सतर्क रहावे.
आयुब तांबोळी, तहसीलदार खालापूर