मुख्य रस्त्यांवरील निचरा करण्याचे आव्हान
| उरण । वार्ताहर ।
उरण शहरातील मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे सुरू असून, आतापर्यंत सत्तर टक्के कामे पूर्ण झाली असल्याचे नगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, शहरातील पाणी निचर्याची समस्या कायम आहे. गतवर्षी नालेसफाईनंतर शहरातील मुख्य रस्ते पावसाच्या पाण्याने ओसंडून वाहत होते.
त्यामुळे नगरपालिकेसमोर यावर्षी हे मोठे आव्हान असणार आहे. उरण शहर परिसर अवघ्या तीन किमी अंतराच्या परिघाचा आहे. येथील मुख्य नाले अगदी मोजकेच आहेत. तरीही दरवर्षीच्या पावसात शहरातील गणपती चौक, स्वामी विवेकानंद चौक, पालवी हॉस्पिटल परिसर, कुंभारवाडा, ग्रामीण रुग्णालय मार्ग आदी ठिकाणी पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचते. त्यामुळे या मार्गाने पायी चालत किंवा वाहनाने प्रवास करणे धोक्याचे बनत आहे. शहरातील ही ठिकाणे तासभर पाणी पडले तरी तुडुंब भरतात. यासाठी नगरपालिकेने नाळेसफाईबरोबर पाणी निचरा होण्याची कायमची उपाययोजना करावी, अशी मागणी उरणकर करत आहेत.
जवळपास 70 टक्के नालेसफाई पूर्ण झाली आहे. मुख्य रस्त्यांवरील पाणी तुंबणारा भाग आमच्या हद्दीत येत नाही. तेथील उपाययोजनांबाबत सिडकोकडे पत्रव्यवहर केला आहे.
समीर जाधव,
मुख्याधिकारी,
उरण नगर पालिका