नागाव-खारगल्ली येथे भीषण अपघात; बोरपाडा येथील प्रकाश भगत यांचा दुर्दैवी मृत्यू

रस्त्याच्या कामाचा दुसरा बळी

|चौल | प्रतिनिधी |

अलिबाग-रेवदंडा मार्गावरील एमएसआयडीसीच्या नियोजनशून्य रस्त्याच्या कामाने आणखी एका नागरिकाचा बळी घेतला आहे. नागाव-खारगल्ली येथे गुरुवारी (दि. 19) सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात बोरपाडा येथील 48 वर्षीय प्रकाश भगत यांचा मृत्यू झाला. रस्त्याच्या कामासाठी ठेवलेल्या मातीच्या ढिगाऱ्याचा अंदाज न आल्याने ते 15 ते 20 फूट खाली कोसळले. दोनच दिवसांपूर्वी बेलकडे-कुरुळ मार्गावरील वाहतूक कोंडीत अडकून दोन वर्षीय आरांशचा मृत्यू झाला होता. आता आणखी एका जीवाचा बळी गेल्याने एमएसआयडीसी आणि ठेकेदारांच्या निष्काळजीपणाविरोधात संताप व्यक्त होत आहे.

अलिबाग-रेवदंडा मार्गावर एमएसआयडीसीमार्फत काँक्रिटीकरण आणि रुंदीकरणाची कामे सुरू आहेत. मात्र, या कामांमध्ये सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा अभाव असल्याचे वारंवार समोर येत आहे. अनेक ठिकाणी सूचना फलक, रात्रीच्या वेळी दिसणारे दिवे आणि बॅरिकेड्स नसल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या कामांमुळे यापूर्वीही अनेक अपघात झाले असून, नागरिक जखमी झाले आहेत. वाहनांचेही नुकसान झाले आहे. मात्र, संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांकडून परिस्थिती गांभीर्याने घेतली जात नसल्याचे चित्र आहे.

गुरुवारी सायंकाळी नागाव-खारगल्ली येथे प्रकाश भगत हे एमएच 06 बीए 2394 या मोटारसायकलवरुन घरी जात असताना त्यांचाही अशाच निष्काळजीपणामुळे बळी गेला. रस्त्याच्या कामासाठी ठेवलेल्या मातीच्या ढिगाऱ्याचा अंदाज न आल्याने ते ढिगाऱ्यावरून थेट रस्त्याखाली 15 ते 20 फूट खोल कोसळल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर जवळपास 20 मिनिटे कोणतीही मदत मिळाली नसल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर त्यांना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

अपघाताची माहिती अलिबाग पोलीस ठाण्याचे बीट मार्शल ब्रिजेश साळावकर यांनी दिली. या घटनेमुळे बोरपाडा परिसरात हळहळ व्यक्त होत असून, रस्त्याच्या कामातील निष्काळजीपणाबाबत नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

.. तर जीव वाचला असता
अपघातानंतर प्रकाश भगत गंभीर अवस्थेत रस्त्याखाली पडलेले असताना त्यांना तातडीने मदत मिळाली नाही. घटनास्थळी संबंधित ठेकेदाराचा कामगार किंवा सुपरवायझरही उपस्थित नसल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णालयात नेण्यासाठीही तातडीने कोणी पुढाकार घेतला नाही. वेळेत मदत आणि उपचार मिळाले असते, तर कदाचित प्रकाश भगत यांचा जीव वाचला असता. रस्त्याचे काम सुरू असताना नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची, असा संतप्त सवाल पुन्हा एकदा उपस्थित होत आहे.

रस्त्याचे काम म्हणजे विकास नव्हे, तर नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. वारंवार अपघात होत आहेत, निष्पाप नागरिकांचे जीव जात आहेत. आणखी किती बळी गेल्यानंतर एमएसआयडीसी प्रशासनाला जाग येणार? कामाच्या ठिकाणी साधे बॅरिकेड्स, सूचना फलक आणि सुरक्षिततेची व्यवस्था करता येत नसेल, कामे करता कशाला? या दुर्घटनांची जबाबदारी संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांनी स्वीकारलीच पाहिजे. दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. आम्हाला जनतेच्या जिवाची किंमत मोजून केलेला विकास नकोय.

हर्षदा मयेकर,
सरपंच, नागाव
Exit mobile version