करंजात भीषण पाणीसंकट; पंधरा दिवसांनी होतोय पाणीपुरवठा

संतप्त ग्रामस्थांकडून 1 मार्चला मोर्चाचा निर्धार

| उरण | वार्ताहर |

तालुक्यातील चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील करंजा ग्रामस्थांना 15 ते 20 दिवसाआड पिण्याचे पाणी उपलब्ध होत आहे. त्यामुळे भीषण पाणीटंचाईचा सामना ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्यासाठी 1 मार्चला एल्गार करण्याचा निर्णय व्यक्त केला असून, एकच मागणी, हवे हक्काचे पाणी, या मागणीसाठी उरण तहसील कार्यालयावर काढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातही चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील करंजा ग्रामस्थांना 15 ते 20 दिवसातून एकदा तासभर पाणी येत आहे. याविरोधात सात पाड्यातील ग्रामस्थ एकवटले आहेत. एकच मागणी, हवे पिण्याचे पाणी असा एल्गार करीत बुधवारी 1 मार्चला उरण तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्धार रविवार, दि. 19 रोजी कोंढरी येथील हनुमान मंदिरात झालेल्या बैठकीतून व्यक्त केला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील करंजा येथील 30 हजारांच्या लोकवस्तीच्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. या गावातील ग्रामस्थांना 15 दिवसातून एकदा तासभर येणारे पाणी 20 दिवसांवरून आता 28 दिवसांवर येऊन पोहोचली आहे. त्यामुळे महिलावर्गाला पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रशासन, एमआयडीसी, लोकप्रतिनिधी यांच्याविरोधात असंतोषाची भावना पसरली आहे. त्यातच येथील अपुर्‍या व अनियमित पाणीपुरवठ्याचा फटका हा द्रोणागिरी विद्यालयातील विद्यार्थ्यांना बसत आहे.

चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांना भेडसावणार्‍या पाणीटंचाई संदर्भात योग्य ती उपाययोजना करण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर यांनी शासकीय स्तरावर सतत केले परंतु सुस्तावलेले प्रशासन या जीवनावश्यक बाबाकडे दुर्लक्ष करत असल्याने त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी करंजा ग्रामस्थांनी रविवारी (दि 19) गावस्तरावर बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी सचिन डाऊर, कामगार नेते कॉम्रेड भूषण पाटील,संतोष पवार, महिला नेत्या हेमलता पाटील, कुसुम ठाकूर, माजी जि.प. सदस्य नाखवा, करंजा मच्छिमार सोसायटीचे अध्यक्ष प्रदीप नाखवा, चाणजे ग्राम पंचायत सदस्य रवी कोळी, करंजा सोसायटीचे सदस्य, माजी ग्रामपंचायत सदस्या आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी 1 मार्च रोजी उरण तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

अनेक योजना पाण्यात
उरण तालुक्यातील सर्वात मोठ्या चाणजे ग्रामपंचायतीत अनेक दशकापासून करंजा सात अनियमित पाणी पुरवठ्याची समस्या आहे. ही समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषद, राज्य व केंद्र सरकारच्या अनेक योजना राबविल्या गेल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून करंजा परिसरासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. असे असतानाही करंजा येथील अनियमित व अपुर्‍या पाणी पुरवठ्याची समस्या कायम आहे. यामध्ये ग्रामस्थांपर्यंत पाणीच पोहोचत नाही. ते फस्त होत असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. या गावांना एमआयडीसीच्या रानसई धरणातून व नवी मुंबईच्या हेटवणे धरणातून अशा दोन योजनांतून पाणीपुरवठा केला जात आहे.

Exit mobile version