ग्रामस्थांचे हाल, ग्रामपंचायतीत सरपंचांसोबत संवाद
| रेवदंडा | प्रतिनिधी |
मुरूड तालुक्यातील कोर्लई गावात गेल्या महिनाभरापासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, पाण्याअभावी ग्रामस्थांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर कोर्लई ख्रिश्चनपाडा येथील ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत प्रशासन यांच्यात ग्रामपंचायतीत संवाद व चर्चा आयोजित करण्यात आली.
कोर्लई गावात काही वर्षांपूर्वी ‘जलजीवन’ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली असून या योजनेअंतर्गत फणसाड धरणातून गावाला पाणीपुरवठा केला जातो. मात्र, सध्या मुरूड तालुक्यात रेवसरेड्डी मार्गावरील मुख्य रस्त्याचे नूतनीकरण, काँक्रिटीकरण आणि रुंदीकरणाचे काम सुरू आहे. तसेच मांडळा ते फणसाड धरण या मार्गावरही नवीन रस्त्याच्या कामासाठी अनेक ठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे.
या कामादरम्यान ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे जनजीवन पाणीपुरवठा योजनेंतर्गत टाकण्यात आलेल्या पाईपलाईन अनेक ठिकाणी फुटल्याचे समोर आले आहे. फुटलेल्या पाईपलाईनची तात्पुरती दुरुस्ती केली जात असली तरी त्यातून पाणी झिरपत राहते. त्यामुळे कोर्लई गावापर्यंत पाण्याचा दाब योग्य प्रमाणात पोहोचत नसल्याने गावात पाणीपुरवठा होत नाही. परिणामी, गावात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याची स्थिती आहे.
या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी कोर्लई ग्रामपंचायतीत सरपंच राजश्री मिसाळ आणि ग्रामस्थ यांच्यात संवाद झाला. ग्रामस्थांनी पाणी समस्येबाबत सरपंचांकडे आपली व्यथा मांडली. यावेळी सरपंच राजश्री मिसाळ यांनी रस्त्याच्या कामादरम्यान पाईपलाईन फुटल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, कोर्लई ख्रिश्चनपाडा येथील ग्रामस्थ तसेच शिवसेना युवासेना उपतालुका प्रमुख विकी वेगस यांनी संबंधित विभागांना या पाणी समस्येबाबत पत्र देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. रस्त्याच्या कामामुळे नुकसान झालेली पाईपलाईन नव्याने टाकून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. तसेच सध्या ख्रिश्चनपाडा परिसरातील ग्रामस्थांना कोर्लई ग्रामपंचायतीमार्फत टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती सरपंच राजश्री मिसाळ यांनी दिली.







