अपूर्ण जलजीवन योजनेचा फटका
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल तालुक्यातील अर्धवट स्थितीत असलेल्या जलजीवन मिशन योजनेच्या कामामुळे आजही पनवेल तालुक्यात भीषण पाणीटंचाई कायम आहे. एप्रिल महिन्यात पाणीटंचाई गंभीर बनलेली आहे. अद्याप मे महिना बाकी आहे.
जलजीवन मिशन योजनेची 131 ठिकाणी कामे सुरू आहेत. यापैकी 51 ठिकाणी विहीर आणि विंधण विहिरी खोदण्याचे काम सुरू आहेत. आपटा ग्रामपंचायत हद्दीतील टोकाची वाडी, सोनारवाडी, नेरे, टेमघर येथे विहिरीच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली नाही. रीटघर येथे जुन्या विहिरीचे खोलीकरण सुरू करण्यात आले नाही. महाळुंगी आणि टॉवरवाडी येथे विहिरीचा गाळ काढण्यास सुरुवात करण्यात आलेली नाही. वाघाची वाडी आणि मालडुंगे येथील कुंभटेकडी, पाली खुर्द येथे विहिरीचे खोलीकरणाला सुरुवात नाही. वाजेपूर येथे बोअरवेलच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली नाही. लोणीवलीवाडी, निताळे येथे विंधण विहिरीला सुरुवात करण्यात आली नाही.
पनवेल तालुक्यात जलजीवन मिशन योजनेची कामे संथगतीने सुरू आहेत. 131 कामांपैकी केवळ 17 कामे पूर्ण आहेत. ठेकेदारांच्या उदासीनतेमुळे अनेक ठिकाणची कामे अर्धवट स्थितीत आहेत. गेल्या तीन ते चार वर्षांपासून कामे सुरू आहेत. अनेक ठिकाणाचे भूस्तर आणि उच्च साठवण टाक्यांची कामे अर्धवट आहेत. मोजकेच ठिकाणची कामे पूर्ण असून काही ठिकाणी अद्याप सुरुवात करण्यात आलेली नाही. जलजीवन मिशन योजनेची कामे पूर्ण न झाल्याने पाणीटंचाईची समस्या पनवेल तालुक्यात कायम आहे.
योजनेंतर्गत विहिरींचे काम पूर्ण
घेराकिल्ला, गिरवले, देवळोली, नारपोली, शिवणसई, खानाव, देहरंग, धामणी, नेरेपाडा, चिंचवली, करंबेळी तर्फे तळोजे, महोदर, वांगणी तर्फे तळोजे, उमरोली, वाकडी, शांतीवन, गाढेश्वर, वाजे
विंधण विहिरीचे (बोअरवेल) काम पूर्ण
आंबे तर्फे वाजे, चिंचवली तर्फे वाजे, कोंडप, आंबिवली