सिडकोच्या नरिमन पॉईंट कार्यालयावर धडकणार मोर्चा
| पनवेल | प्रतिनिधी |
दिवसेंदिवस तळोजा वसाहतीतील पाणीप्रश्न गंभीर होत चालला असून, या प्रश्नावर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तळोजा रहिवासी सिडकोच्या मुख्य कार्यालयावर धडक देणार आहेत. आतापर्यंत पाण्यासाठी तळोजा फेडरेशनने सहा आंदोलने केली आहेत. त्यातील काही आंदोलने भरपावसातदेखील करावी लागली. परंतु, तात्पुरता दिलासा दिल्यानंतर वारंवार पाणीप्रश्न निर्माण असल्याने येथील रहिवासी पाण्यासाठी त्रस्त आहेत.
तळोजा वसाहत टँकरमुक्त करण्यासाठी शहराचे शिल्पकार सिडकोतर्फे जलकुंभ बांधण्यात आली. पण, या जलकुंभावर टँकर भरले जात आहेत. तळोजा फेज 2 चा जलकुंभ पूर्ण क्षमतेने वापरला जात नाही, फेज 2 मधील जवळपास सर्वच इमारतींना खारघर येथील जलकुंभावरून पाणीपुरवठा केला जातो. ज्या इमारतींना कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्या इमारतींना समान पाणीपुरवठा व्हावा म्हणून जानेवारीमध्ये पाईपलाईनचे काम पूर्ण होणार, असे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे पाईपलाईन टाकण्यात आली. पण, मुख्य पाईपलाईनला जोडणी करण्यात आली नसल्याने काही इमारतींना तर आठवडा-आठवडा पाणीच मिळत नाही. त्यांना पाणी शून्य रीडिंग इतके सप्लाय होते. पाणीपुरवठ्यासाठी प्रचंड प्रमाणात टँकरचा वापर केला जातो. या वसाहतीतील पाणीसमस्या गंभीर बनली असून, तळोजा वसाहतीत घरे घेऊन नागरिक मनस्ताप करत आहेत.
तळोजा वसाहतीसाठी असणारे पाणी कुठे जाते याबाबतची माहिती माहिती अधिकाराखाली मागवलेल्या माहितीमध्ये जलकुंभामध्ये किती पाणी येथे,आणि जलकुंभातून किती पाणी विसर्ग होते. यासंदर्भातत सिडको पाणीपुरवठा विभागाकडे माहिती उपलब्ध नसल्याचे कळविण्यात आले. यात प्रचंड मोठा भ्रष्टाचार असल्याचा गंभीर आरोप ढगेपाटील यांनी केला आहे. अनेक वेळा सिडको जलकुंभावर अवैध्य पद्धतीने टँकर भरून विकासकांच्या इमारतींना पाणीपुरवठा करत असल्याचे रंगेहाथ टँकर पकडून देऊनसुद्धा कोणतीही कारवाई होत नसल्याने रहिवासी हतबल झाले आहेत. या अनेक मागण्या आणि समस्या घेऊन सिडको व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे पाठपुरावा केला असता सिडको व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडून शिष्टमंडळाला भेटीसाठी टाळाटाळ केली जात असल्यामुळे सिडकोच्या नरिमन पॉईंट येथील (निर्मल बिल्डिंग) मधील कार्यालयासमोर 14 मे रोजी आंदोलन करण्याचा निर्णय तळोजा फेडरेशन कमिटीने घेतला आहे. त्यासंदर्भातले पत्र सिडको नरिमन पॉईंट कार्यालय, मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे, नगररचना विभाग मंत्रालय आणि मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले आहे.
तळोजा फेडरेशन पाणी मुद्द्यावर ठाम
शहरातील सर्व सोसायट्यांना जोपर्यंत योग्य प्रमाणात पाणी मिळत नाही आणि हा प्रश्न संपूर्णतः निकाली निघत नाही, तोपर्यंत तळोजा फेडरेशन संघर्ष करतच राहणार, संघटनेने यापुढे सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचे ठरवले आहे, त्या दृष्टीने पुरावे गोळा करणे व अन्य तयारी चालू केली असल्याची माहिती तळोजा फेडरेशनचे अध्यक्ष प्रसाद ढगेपाटील यांनी दिली.
