हंडाभर पाण्यासाठी मैलभर वणवण; टँकरने पाणीपुरवठ्याची मागणी
| चिरनेर | प्रतिनिधी |
चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील चांदायली वाडी व केळ्याचा माळ या वाड्यांना तीव्र पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. यामुळे आदिवासी बांधवांना पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागत आहे. चिरनेर ग्रामपंचायतीच्यावतीने या वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, जिल्हा परिषदेकडून या वाड्यांवर टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आली आहे.
या आदिवासी वाड्यांमध्ये जवळजवळ 45 ते 50 आदिवासी कुटुंबे वास्तव्य करीत आहेत. या वाड्यातील विहिरींनी जानेवारी महिन्यातच तळ गाठला आहे आणि तेव्हापासून या आदिवासींची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. ग्रामपंचायतीने या वाड्यांना तातडीचे पाण्याची सोय म्हणून मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. मात्र, या टँकरचा खर्च ग्रामपंचायतीला परवडत नसल्याने जिल्हा परिषदेतर्फे या वाड्यांना पाणीपुरवठा करावा, अशा मागणीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेला पाठविण्यात आला आहे.
चिरनेर ग्रामपंचायतीत गावातील नळांना एकीकडे धो धो पाणी सुरू असून, दुसरीकडे आदिवासी वाड्यांमध्ये नळांना पाण्याचा एक थेंब नाही, अशी परिस्थिती आहे. नवी मुंबईला हेटवणे धरणातून पाणीपुरवठा करणारी पाण्याची लाईन ही चिरनेर गावावरून गेली असल्यामुळे या ग्रामीण भागातील अनेक गावांना नळ कनेक्शन देण्यात आले आहेत. त्यामुळे या भागातील लोकांचा पाणीप्रश्न सुटला आहे.
जलजीवनचे काम कूर्मगतीने
दरम्यान, शासनाने या आदिवासी वाड्यांना पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी जलजीवन योजनेतून एक कोटी 98 लाख रुपयांची योजना मंजूर केली आहे. दीड दोन वर्षांपासून या योजनेचे काम सुरूदेखील झाले आहे. मात्र, 25 टक्क्यांपर्यंतचे काम पूर्ण झाले असल्यामुळे आदिवासीवाड्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
ग्रामपंचायतीतर्फे मार्च महिन्यापासून या वाड्यांवर टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. आता ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेकडून टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. तसा प्रस्ताव बीडीओंमार्फत पाठविण्यात आला आहे.
महेशकुमार पवार,
ग्रामविकास अधिकारी, चिरनेर