। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत नगरपरिषदेच्या स्वच्छतेबद्दल केंद्र सरकारने थ्री स्टार नामांकन दिले आहे.त्याच कर्जत पालिकेच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील दोन इमारतींचे सांडपाणी इतरांच्या अंगणात पोहचले आहे. त्याबाबत पालिकेच्या मुख्याधिकार्यांना तक्ररी करण्यात आल्या आहेत, मात्र मुख्याधिकारी किंवा पालिका प्रशासन यांच्याकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही, त्यामुळे स्थानिक नागरिक देखील पालिकेच्या या दुर्लक्षपणामुळे नाराज झाले आहेत.
नगरपरिषद क्षेत्रातील शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ समोर लोकेंद्र आणि लेकेंद्र या नागरी सोसायटी आहेत. त्या सोसायटीमधील सांडपाणी भिंतीच्या कंपाउंड खालून आजूबाजूला पोहचत आहे. तेथील रहिवाशी सदाशिव रहातेकर यांच्या घराच्या पाठीमागे आवारात ते सांडपाणी पसरलेले असून आजूबाजूला प्रचंड प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. त्या दोन्ही इमारतींचे दुर्गंधीयुक्त पाणी जमिनीत मुरून त्यांच्या आजूबाजूला पसरत आहे. त्यात राहतेकर यांच्या आवारात असलेल्या विहिरीतच्या पाण्याला दुर्गंधी पसरली आहे. हे पाणी ते कुटुंब घरात वापरत असल्याने त्यांच्या घरातील पिण्याचे पाणी दुषीत झाले आहे. परिणामी त्या कुटुंबाचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. होऊन आरोग्य धोक्यात आले आहे. त्याबाबत लेखी तक्रार 26 नोव्हेंबर रोजी कर्जत नगरपरिषदेत जाऊन केली आहे. या तक्रारी अर्ज देऊन सुध्दा तक्रारीची अद्याप दखल घेत नसल्यामुळे नगरपरिषदेच्या कारभाराबद्दल वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक रहातेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.







