दुर्गंधी पाण्यामुळे आरोग्य धोक्यात
| माणगाव | प्रतिनिधी |
गेली दोन दिवस पडलेल्या धुवांधार कोसळणाऱ्या पावसाने माणगाव शहराला झोडपून काढले आहे. त्यामुळे नदी, नाले, गटारे आणि शेती पाण्याने तुडुंब भरून ओसंडून वाहत आहेत. मात्र, शहरातील विविध भागातील गटरातील सांडपाणी आणि मलमूत्र खांदाड गावाच्या परिसरात येत असल्याने अतिशय दुर्गंधी येत आहे. त्यामुळे खांदाड गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच हे गटाराचे पाणी शेतजमिनीत घुसून दरवर्षी भातशेतीचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे येथील शेकडो एकर जमीन नापीक बनली आहे. याची नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी खांदाड येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
माणगाव शहरातील मोर्बा रोड, कमल फर्निचर, एसटी बस स्थानक येथील दुतर्फा असलेल्या गटाराचे सांडपाणी आणि मलमूत्र तसेच पावसाचे पाणी खांदाड गावात येत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. मोरबा रोड येथील गटारांची साफसफाई दोन वर्षांपासून केलेली नाही. त्यामुळे या महामार्गावरील गटारात सर्व प्रकारचा कचरा, सांडपाणी आणि मलमुत्र तसेच पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात तुंबलेल्या अवस्थेत होते. या पाण्याला कोठेही जाण्यासाठी मार्ग नाही. या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी होत आहे. तसेच जवळपास माणगाव शहरातील सांडपाणी खांदाड, मोरबा रोड, बामणोली रोड येथील शेकडो एकर जमिनीत घुसून दरवर्षी भातशेतीचे अतोनात नुकसान होत आहे. वारंवार मागणी करूनही प्रशासन दुर्लक्ष करून कानाडोळा करीत आहे. संपूर्ण शेतजमीन नापीक बनली आहे. शेतात कायमस्वरूपी पाणी तुंबल्याने यावर्षीही शेतकऱ्यांनी पेरणी केली नाही. पूरनियंत्रण नियम आल्याने घरेही बांधू शकत नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थांची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. या सर्व समस्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.







