| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान शहर सध्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाच्या संक्रमणातून जात आहे. शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून घेण्यासाठी प्रकल्प राबविला जात आहे. मात्र, शहरात वेगेवेगळ्या सहा ठिकाणी सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प राबविले जात असून, त्यातील पंचशील नगर येथील उद्यानाच्या जागेवरील मलनिःसारण प्रकल्पास स्थानिकांनी विरोध केला आहे.उद्यानासाठी स्थानिकांनी ती जागा राखून ठेवली आहे आणि त्या ठिकाणी जागा मोकळी दिसल्याने मलनिःसारण प्रकल्प उभारण्यास विरोध असल्याचे पत्र पालिकेकडे देण्यात आले आहे.
माथेरान शहारातील भौगोलिक रचना लक्षात घेऊन सांडपाण्याचे नियोजन करण्यासाठी शहरात सहा ठिकाणी मलनिःसारण प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्यासाठी शासनाचे 50 कोटी रुपये खर्च होणार असून, गेल्या महिन्यापासून प्रकल्पाचे काम सुरु करण्यात आले आहे. प्रामुख्याने नागरी वस्तीमध्ये घरे जवळ जवळ असल्याने त्या भागातील सांडपाण्याचे नियोजन करण्यासाठी ते सांडपाणी एकत्रित केले जात आहे. नागरी भागात सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प उभारले जात असून, त्यातील पंचशील नगर भागात एक सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प उभारला जाणार आहे. पंचशील नगर प्रवेशद्वाराच्या जवळ स्थानिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान उभारण्यासाठी भूखंड राखून ठेवला आहे. त्या भूखंडावर अनेक वर्षे स्थानिकांनी कोणालाही अतिक्रमण करून बांधकाम करू दिले नाही. त्यात संपूर्ण पंचशील नगरमधील लोकवस्ती ही या भागात खालच्या भागात आहे तर प्रकल्पासाठी निवडण्यात आलेली जागा हि वर आहे. त्यामुळे सांडपाणी पंप लावून उचलून घ्यावे लागणार आहे.ते गुरुत्वाकषणाचा नियमाचा आधार घेता सहज शक्य नाही आणि त्यामुळे त्या ठिकाणाचा प्रकल्प यशस्वी होण्याची शास्वती फार कमी आहे.
मात्र आम्ही भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने उद्यान विकसित करण्यासाठी आणि त्या उद्यानांत बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यासाठी जागा राखीव ठेवली आहे. असे असतानादेखील पालिकेकडून स्थानिकांना विश्वासात न घेता सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे काम सुरु करण्याचे नियोजन सुरु आहे. त्यास स्थानिक नागरिकांच्या वतीने आरपीआय आठवले गटाचे शहर अध्यक्ष अनिल गायकवाड यांनी विरोध करणारे पत्र माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेस दिले आहे. पालिका आमचे म्हणणे ऐकून घेणार नसेल तर आम्हाला आमच्या महापुरुषांच्या नावे राखून ठेवलेली जमीन वाचविण्यासाठी आम्ही सर्व एकत्र येऊन पालिकेला विरोध करणार आहोत.
पंचशील नगर येथील मोकळ्या जमिनीवर सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प उभारला जाणार आहे. ती जागा पालिकेने अद्याप कोणत्याही उद्यानासाठी राखीव ठेवण्यात आलेली नाही. मात्र, स्थानिकांचे म्हणणे ऐकून घेऊन योग्य निर्णय घेतला जाईल असे आश्वासन नागरिकांना दिले आहे.
अभिमन्यू येळवंडे,
नगर अभियंता