लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

मानखुर्द येथे राहणाऱ्या एका तरुणाने विक्रोळी येथे राहणाऱ्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. तरुणी गर्भवती राहिल्यानंतर तिच्यासोबत लग्न करण्यास तरुणाने नकार दिला. पीडित तरुणीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. आरोपी तरुणाचे नाव शशिकांत खरात (33) असे असून, तो मानखुर्द येथे राहण्यास आहे. तर पीडित तरुणी विक्रोळी येथे राहण्यास आहे.

वर्षभरापूर्वी या दोघांची ओळख होऊन मैत्री झाली होती. त्यानंतर त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर आरोपी शशिकांत याने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिला रबाळेतील साईराज लॉजमध्ये नेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. त्यानंतरदेखील आरोपीने पीडित तरुणीला रबाळेतील पूजा लॉजमध्ये नेऊन तसेच मानखुर्द येथील घरी नेऊन पीडित तरुणीसोबत अनेक वेळा जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. त्यामुळे तरुणी गर्भवती राहिल्यानंतर तिने लग्न करण्यासाठी तगादा लावला असता त्याने नकार दिला. अखेर पीडित तरुणीने विक्रोळी येथील पार्क साईट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी शशिकांत विरोधात गुन्हा दाखल केला. हा गुन्हा पुढील तपासासाठी रबाळे एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Exit mobile version