लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

। उरण । प्रतिनिधी ।

उरण येथे राहणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलाने इन्स्टाग्रामद्वारे ओळख झालेल्या रसायनी येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर या अल्पवयीन मुलाने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी रसायनी येथील रहिवासी असून, तिच्यावर अत्याचार करणारा 16 वर्षीय मुलगा उरण येथे राहतो. दोघांनीही आपले शिक्षण अर्धवट सोडले आहे. जानेवारी 2024 मध्ये इन्स्टाग्रामवर त्यांची ओळख झाली आणि त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. काही महिन्यांपूर्वी पीडित मुलीच्या पालकांना याबाबत माहिती समजली. त्यांनी उरण येथे जाऊन अल्पवयीन मुलाच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी मुलाने पीडित मुलीशी लग्न करण्याची तयारी दर्शवली होती. पीडित मुलीच्या पालकांनी तिचे वय पूर्ण झाल्यावर लग्न लावून देण्याचे मान्य केले आणि तोपर्यंत मुलीला मुलाच्या घरी ठेवले होते. मात्र, पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर अल्पवयीन मुलाने आणि त्याच्या कुटुंबीयांनी लग्नास नकार देत तिला घरातून हाकलून दिले. त्यानंतर पीडित मुलीने रसायनी येथील आपल्या पालकांच्या घरी परत जाऊन रसायनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरुद्ध लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी, तसेच पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याला बाल सुधारगृहात पाठवले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Exit mobile version