कामोठ्यात बार सिंगरवर लैंगिक अत्याचार

आरोपीचा पोलिसांकडून शोध
पनवेल | वार्ताहर |
 आसुडगांव येथील बारमध्ये सिंगर म्हणून काम करणार्या एका 25 वर्षीय महिलेवर तिच्या ओळखीतील व्यक्तीने जबरदस्तीने एपीएमसीतील लॉजवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. शशिकांत खरात असे या व्यक्तीचे नाव असून एपीएमसी पोलिसांनी त्याच्या विरोधात बलात्कारासह इतर कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.
सदर घटनेतील 25 वर्षीय महिला कोपरखैरणे भागात राहण्यास असून ती पनवेलजवळील कोन परिसर येथील एका ऑर्केस्ट्रा बारमध्ये सिंगर म्हणून काम करते. तर तिच्यावर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी शशीकांत खरात तिच्या ओळखीतीलच असून मागील तीन वर्षापूर्वी या दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र, वर्षभरानंतर त्यांच्यातील प्रेमसंबंध तुटल्यानंतर देखील शशिकांत खरात तिला त्रास देत होता. त्यामुळे पिडीत महिलेने त्याच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार देखील दिली होती. त्यावेळी पोलिसांनी शशिकांत खरात याला समज देखील दिली होती. मात्र, त्यानंतर देखील तो पिडीत महिलेला त्रास देत होता. पिडीत महिला मध्यरात्रीच्या सुमारास बार मधील सिंगींगचे काम संपवून घरी कारने जात असताना शशिकांत खरात याने तिला सायन-पनवेल मार्गावरील कामोठे ब्रीजजवळ अडविले. त्यांनतर त्याने पिडीत महिलेला जबरदस्तीने आपल्या कारमधून एपीएमसीतील प्रिन्स इंटरनॅशनल लॉजवर नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. तसेच पिडीत महिला बारमध्ये सिंगीगचे काम करण्यासाठी गेल्यास तिला बघुन घेण्याची धमकी दिली. सदर प्रकारानंतर घाबरलेल्या पिडीत महिलेने प्रथम आपले घर गाठले. त्यानंतर तिने एपीएमसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी शशिकांत खरात याच्या विरोधात बलात्कारासह, अपहरण तसेच धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच सदरचा गुन्हा पुढील तपासासाठी कामोठे पोलिसांकडे वर्ग केला आहे. दरम्यान, अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नसून त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव यांनी सांगितले.

Exit mobile version