राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला अटक
| वर्धा | प्रतिनिधी |
जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणीवर दीर्घकाळ लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित ज्येष्ठ नेते दिवाकर गमे (78) यांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आले आहे.
पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने नोकरीचे आमिष दाखवून तिचा दीर्घकाळ मानसिक व लैंगिक छळ केला. सुमारे पाच वर्षांपूर्वी या प्रकाराची सुरुवात झाली असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. 2022 साली पीडिता केवळ 21 वर्षांची असताना आरोपीने तिला वारंवार शारीरिक संबंधांची मागणी केल्याचा आरोप आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीचे पीडितेच्या कुटुंबाशी जवळचे संबंध असल्याचेही समोर आले आहे. या नातेसंबंधाचा गैरफायदा घेत आरोपीने तिच्यावर दबाव टाकल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यामुळे पीडितेला दीर्घकाळ मानसिक त्रास सहन करावा लागला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
दरम्यान, तीन दिवसांपूर्वी आरोपीने तरुणीला अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवून पुन्हा त्रास दिल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या तरुणीने अखेर धाडस दाखवत पुलगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध अंतर्गत तसेच इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला. त्यानंतर 7 मार्चच्या सायंकाळी पोलिसांनी आरोपीला अटक केली. तपासासाठी त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला असून, त्यातून आणखी महत्त्वाचे पुरावे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.







