कंपनीकडून घेतली 25 हजारांची खंडणी
| खोपोली | प्रतिनिधी |
खालापूरमधील मे. मॅक्सस्पेअर कंपनीकडून 25 हजारांची खंडणी वसूल करणाऱ्याला खोपोली पोलिसांनी गजाआड केले. कंपनीमध्ये वेगवेगळ्या कामगार कायद्याचे होत असलेल्या उल्लंघनाची तक्रार कामगार आयुक्त कार्यालयात न करण्यासाठी ही मागणी केली होती.
खालापूर तालुक्यातील दहीवली या ठिकाणी मे मॅक्सस्पेअर नावाची कंपनी आहे. या कंपनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कामगार कायद्याचे उल्लंघन होत असल्याबाबत आरोपी पंकज बोराडे यांना मिळाली. त्यांनी कंपनी प्रशासनाशी संपर्क साधला. वेळोवेळी त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्याविरोधात कामगार आयुक्त कार्यालयात तक्रार केली जाईल, अशी धमकी दिली जात होती. पनवेल येथील कामगार आयुक्त कार्यालयात तक्रार न करण्यासाठी पंकज बोराडे यांनी दहा लाख रुपयांची मागणी कंपनी प्रशासनाकडे केली होती. 27 जुलै रोजी कंपनी प्रशासनाला धमकावून त्याने 25 हजार रुपयांची रोकड घेतली होती. उर्वरित रक्कम कंपनीकडून वारंवार मागणी केली जात होती. अखेर कंपनी प्रशासनाने खोपोली पोलीस ठाण्यात तक्रार केली. या घटनेचे गांभीर्य ओळखून रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईची मोहीम वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी हाती घेतली. एक पथक तयार करण्यात आले. या पथकामार्फत कंपनीच्या परिसरात सापळा रचण्यात आला होता. एक ऑगस्ट रोजी पंकज कंपनीमध्ये 25 हजार रुपये घेण्यासाठी आला होता. त्यावेळी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास खंडणी घेताना पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. याप्रकरणी पंकज बोराडे याच्याविरोधात खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.