पटकावला सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा मान
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
शफाली वर्माने महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अफलातून कामगिरी करत 87 धावा केल्या आणि दोन बळी देखील घेतले. तिच्या या कामगिरीमुळे तिला नोव्हेंबर महिन्यातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू पुरस्कार मिळाला. शफालीने या पुरस्काराला संघ, प्रशिक्षक आणि कुटुंबाला समर्पित केले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून प्रत्येक महिन्यातील सर्वोत्तम महिला आणि पुरुष क्रिकेटपटूला पुरस्कार देण्यात येते. त्यानुसार आता नोव्हेंबर महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूंच्या पुरस्काराची घोषणा आयसीसीकडून करण्यात आली. या महिन्यात भारताच्या शफली वर्माने या पुरस्कारावर नाव कोरले आहे. भारताची युवा फलंदाज शफाली वर्माने नोव्हेंबरमध्ये महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 स्पर्धेतील अंतिम सामना खेळला होता. या सामन्यातील तिच्या अफलातून कामगिरीसाठी तिला हा नोव्हेंबर 2025 महिन्यातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू पुरस्कार मिळाला आहे. विशेष म्हणजे 21 वर्षीय शफली वर्मा या जागतिक स्पर्धेसाठी भारतीय संघाचा भागही नव्हती, परंतु, सेमीफायनलपूर्वी प्रतिका रावलला दुखापत झाल्याने तिच्या जागेवर शफालीला संधी देण्यात आली होती. तिने या संधीचे सोने करताना अंतिम सामन्यात 87 चेंडूत 87 धावांची खेळी केली. तिने आक्रमक खेळताना स्मृती मानधनासोबत सलामीला 100 धावांची भागीदारी केली. त्यामुळे भारताला 7 बाद 298 धावांपर्यंत मजल मारता आली होती.इतकेच नाही, तर शफालीने फलंदाजीनंतर गोलंदाजीतही योगदान दिले. तिने दक्षिण आफ्रिकेच्या सून ल्युस आणि मारिझान काप या प्रमुख फलंदाजांना बाद केले. तिने 7 षटकांत 36 धावा खर्च करत 2 बळी घेतले. तिच्या या कामगिरीमुळे तिला अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही मिळाला होता.







