। नागपूर । प्रतिनिधी ।
गेल्या वर्षी कोरियात झालेल्या ज्युनिअर आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत तीन हजार स्टीपलचेस शर्यतीत रौप्यपदक जिंकणार्या भारताच्या शाहरुख खानने पेरू (लिमा) येथे सुरू असलेल्या जागतिक ज्युनिअर अॅथलेटिक्स स्पर्धेत स्टीपलचेस शर्यतीत अंतिम फेरी गाठली आहे. मूळचा उत्तर प्रदेशातील असलेल्या 18 वर्षीय शाहरुखने प्राथमिक फेरीत (हीट) सहावे स्थान मिळविताना शर्यत 8 मिनिटे 45.12 सेकंदात पूर्ण करत अंतिम फेरी गाठली आहे.
युनिअर आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत दोन हीट झाल्या असून प्रत्येक हीटमधील प्रथम आठ धावपटू अंतिम फेरीसाठी पात्र ठरवण्यात आले आहेत. ही कामगिरी करताना शाहरुखने 20 वर्षे वयोगटात भारताच्या नवीन राष्ट्रीय विक्रमाचीही नोंद केली आहे. यापूर्वीचा 8 मिनिटे 50.12 सेकंदाचा विक्रम राजस्थानच्या राजेशच्या नावावर होता. यापूर्वी शाहरुखची सर्वोत्तम वेळ 8 मिनिटे 51.75 अशी होती. सध्या लखनौ येथे विमल राय यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणार्या शाहरुखचा परिवार हा ट्रॅक ड्रायव्हरचा परिवार म्हणून ओळखला जातो. शाहरुखच्या कामगिरीमुळे अविनाश साबळेनंतर जागतिक पातळीवर त्यास भारताचे आशास्थान म्हणून पाहिले जात आहे.
जयकुमारकडून आशा
मुलांच्या चारशे मीटर शर्यतीत भारताच्या जयकुमारने अंतिम फेरी गाठून आशा पल्लवित केल्या आहेत. मिश्र रिलेची अंतिम शर्यत धावल्यानंतर तो चारशे मीटर शर्यतीत सहभगी झाला. त्याने हीटमध्ये तिसरे स्थान मिळविताना 46.96 सेकंद अशी वेळ दिली.