अवघा 15 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक
| पेण | प्रतिनिधी |
उत्तर शहापाडा योजनेतील 27 गावे व 43 वाड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या शहापाडा धरणाची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात खालावली असून, सध्या धरणात केवळ पंधरा दिवस पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. धरणात तळ गाठलेले मृत गाळयुक्त पाणी शिल्लक असून, ते पाणी पिण्यासाठी सोडल्यास नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून बंद असलेला पाणीपुरवठा जरी सध्या सुरु करण्यात आला असला, तरी तो अत्यंत कमी दाबाने होत आहे. हेटवणे कालव्याचा पाणीपुरवठा बंद केल्यामुळे भोगावती नदीपात्रातील पाणीसाठा आटला असून, याचा फटका पेण शहरातील सुमारे एक लाख लोकसंख्येला तसेच वाशी, वडखळ व खारेपाट विभागातील 27 गावे व 43 वाड्यांना बसणार आहे. एकूण दीड लाख लोकसंख्येच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पेण शहराला हेटवणे किंवा आंबेघर धरणातून थेट पाणीपुरवठा करणारी कोणतीही स्वतंत्र योजना अस्तित्वात नाही. भोगावती नदी पात्रातील पाणी पिंपळडोह येथून लिफ्ट करुन ते नागरिकांना दिले जाते. मात, सध्या हेटवणे कालव्याच्या भूमीगत पाइपलाइनचे काम सुरू असल्याने कालवा विभाग व हेटवणे प्रकल्प संस्थेने सिंचनासाठी सोडण्यात येणारे पाणी बंद केले आहे. त्यामुळे खारेपाट विभागातील गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.
हेटवणे कालव्यातून पाणी मिळेपर्यंत टंचाईच
हेटवणे धरणातून सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईला पाणीपुरवठा होत असतान, पेणच्या जनतेला मात्र दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. येणाऱ्या नव्या वर्षात शहरातील लोकसंख्या वाढणार असल्याने ‘धरण उशाला आणि कोरड घशाला' अशी स्थिती नागरिकांच्या वाट्याला येण्याची भीती व्यक्त होत आहे.
पाणीटंचाईबाबत दोन दिवसांपूर्वी प्रांत कार्यालयात झालेल्या बैठकीत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. पेणला पाणीपुरवठा न झाल्यास सिडकोचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा देण्यात आला असून, कालव्याद्वारे पाणीपुरवठा तातडीने पाणी सोडण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
-योगेश पाटील,
माजी सरंपच, वडखळ
पाणी ही जीवनावश्यक बाब आहे. तीन दिवसांआड मिळणारे पाणी जेमतेम अर्धा तास ते 40 मिनिटेच येते. जलवाहिन्या फुटणे व त्यातून होणारा विलंब लक्षात घेता, नवीन वर्षात ही समस्या गंभीर होण्यापूर्वीच हेटवणे कालव्याद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा.
-प्रभाकर म्हात्रे,
माजी जि.प.सदस्य वढाव, वडखळ







