| अलिबाग | वार्ताहर |
शहाबाज येथील सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालयाचा 108 वा वर्धापनदिन बुधवारी (दि.3) उत्साहात पार पडला. या निमित्ताने वाचनालयाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन वाचनालयाच्या आजी-माजी अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन, सरस्वतीपूजन आणि ग्रंथपूजन करण्यात आले.
शहाबाज येथील सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालयाचा 108 वर्षे झाल्याने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रास्ताविकात वाचनालयाला लाभलेला समृद्ध वारसा, 108 वर्षांची परंपरा आणि त्यामध्ये झालेले अनेक बदल सांगण्यात आले. यावेळी सलग पाच वर्षे अविरत कार्य केलेल्या माजी समिती सदस्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच या अहवाल वर्षांमध्ये ज्या ज्या देणगीदारांनी सढळ हस्ते पुस्तक अथवा आर्थिक स्वरूपामध्ये मदत केलेली आहे, अशा मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात समीर पाटील आणि नितीन म्हात्रे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या वेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतात नितीन पाटील यांनी घेतलेला वारसा पुढे चालवत आपल्या नवीन योजनांची मांडणी केली. तसेच वाचनसंस्कृती टिकवून ठेवण्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगून नवीन समितीमार्फत वाचकवृद्धी यशस्वी करण्याचा संकल्प केला. या कार्यक्रमाला वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष मंगेश भगत, निवृत्ती पाटील, मारुती बैकर यांच्यासह वाचनालयाचे सर्व समिती सदस्य, ग्रंथालय, कर्मचारी, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रगती पाटील यांनी; तर आभारप्रदर्शन प्रशांत पाटील यांनी केले.