| कोल्हापूर | प्रतिनिधी |
महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी दिलेली भक्कम एकजुटीची साक्ष आणि त्या साक्षीला प्रतिसाद देत कार्यकर्त्यांच्या मोहोळ अशा सळसळत्या, उत्साहवर्धक वातावरणात लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार श्री शाहू छत्रपती यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने महाविकास आघाडीने प्रचंड शक्तिप्रदर्शन करत एकजूट दाखवून दिली. रणरणत्या उन्हाची तमा न करता जिल्ह्याच्या कानाकोपर्यातून कार्यकर्ते दाखल झाले होते. त्यामुळे दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर अक्षरश: महाजनसागर लोटला होता. हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या जनतेने शाहू छत्रपतींच्या विजयाचा निर्धार पक्का केला. हात उंचावत कोल्हापूरची अस्मिता शाहू छत्रपती, शिवशाहूंचा विचार दिल्लीला पाठवू या अशा घोषणा देत या समुदायाने संपूर्ण जिल्हा महाविकास आघाडीच्या पाठीशी असल्याचे ग्वाही दिली.
फुलांनी सजवलेल्या वाहनात खास तयार करण्यात आलेल्या ओपन टफमध्ये श्री शाहू छत्रपती यांच्यासह महाविकास आघाडी घटक पक्षातील प्रमुख नेते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार श्रीमती जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर, शरद पवार गट राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा विद्या चव्हाण, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सरोज पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, माजी आमदार संजय घाटगे, गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास नारायण पाटील, शिवसेनेचे उपनेते जिल्हा प्रमुख संजय पवार, शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हा प्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील, दौलत साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष गोपाळराव पाटील, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अप्पी पाटील, गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्ष स्वाती कोरी, राष्ट्रवादीच्या नेत्या डॉ. नंदाताई बाभूळकर, माजी आमदार सुरेश साळोखे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, गोकुळचे संचालक अंबरिश घाटगे, माजी संचालक रामराजे कुपेकर, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, आपचे संदीप देसाई, वंचित बहुजन आघाडीचे दयानंद कांबळे यांच्यासह विविध संस्था, संघटना व पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.






