। नागोठणे । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यासह संपूर्ण कोकणात प्रसिद्ध असलेल्या व सध्या लोप पावत असलेल्या शक्तीतुरा नाचांच्या कार्यक्रमाचे आयोजन नागोठण्यातील वरवठणे येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नागोठणे शहरासह नागोठणे ग्रामीण परिसरातील अबाल वृद्ध नागरिक, तरुण वर्ग व महिला वर्गाने उस्फूर्त दाद देत तुफान गर्दी केली होती. यामुळे वरवठणे गावची ग्रामदेवता श्री चौंडेश्वरी मातेच्या प्रांगणात हा शक्तीतुरा नाचांचा सामना चांगलाच रंगलेला पहायला मिळाला.
नवरात्र उसवानिमित्त नागोठण्याजवळील वरवठणे गावची जागृत ग्रामदेवता श्री चौंडेश्वरी मातेच्या दुसर्या माळेवर मंदिरासमोरील प्रांगणात आयोजित केलेल्या शक्तीतुरा नाचाच्या सामन्याचे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड-कशेडी येथील शक्तिवाले सुकाई नाच मंडळाच्या गायिका दिपाली शिंदे व रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील तिसे येथील तुरेवाले वीर हनुमान नाच मंडळाचे शाहीर वसंत भोईर यांच्यात कै. वामनशेठ म्हात्रे यांच्या स्मरणार्थ किशोर म्हात्रे यांच्याकडून आयोजन करण्यात आले होते.
शक्तीवाले नाच मंडळाच्या गायिका दिपाली शिंदे यांच्याकडून पहिल्या बारीला सुरुवात झाली. यानंतर त्यांनी एकाहून एक सरस गीते, गवळण सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. यानंतर तुरेवाले गायक शाहीर वसंत भोईर यांनी दिपाली भोईर यांनी सादर केलेली गवळण व इतर गाण्यांना प्रतिउत्तर म्हणून आपल्या खास शैलीत सदाबहार गीते सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली. शाहीर वसंत भोईर यांनी प्रेक्षकांमधून आलेल्या खास फरमाईशसुद्धा पूर्ण करीत प्रेक्षकांची दाद मिळविली.