यशवंतरावानंतर शरद पवारच; आ.जयंत पाटील यांचे प्रशंसोद्गार
| पुणे | माधवी सावंत |
सध्याची राजकिय परिस्थिती बदलली असली तरी आम्ही महाविकास आघाडीतच आहोत. शरद पवारांची तुलना दुसऱ्या कोणत्याही नेत्यासोबत होऊ शकत नाही. कारण महाराष्ट्राच्या जडणघडणीत यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर शरद पवार यांचे मोलाचे योगदान आहे. वयाचं काही नसतं, आपण कोणासाठी लढतो, हे महत्वाचं आहे. आमच्यात वैचारिक मतभेद होतात, मात्र आम्ही कायमच त्यांनी साथ दिली असल्याचं मत शेकापचे आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केले. पुणे येथे आयोजित केलेल्या सत्ता परिवर्तन शिबिराप्रसंगी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आ. अबू आझमी, भालचंद्र कांगो अन्य मान्यवर उपस्थित होते.
यापुढे मार्गदर्शन करताना आ. जयंत पाटील म्हणाले की. शाहू, फुले, डॉ. आंबेडकरांना मानणाऱ्या पक्षाना एकत्र करण्याचे काम आम्ही करीत आहोत. त्यासाठी प्रागतिक पक्षाची आघाडी विस्तृतपणे केली आहे. सत्ता परिवर्तन करण्याच्या उद्देशाने, तरुणांना घडविण्यासाठी 13 पक्षांच्या सोबतीने अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले.
विचारांचे पक्के
सध्याच्या राजकिय परिस्थितीत ताकद कमी असली तरी विचाराने पक्के आहोत. राज्यातील शेतकरी, कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा लढा आहे. आज कोणता नेता कुठे आहे, माहित नाही. आणि प्रागतिक पक्षातील घटक पक्षाना किती फायदा होईल, याची गणितं आम्ही मांडली नाहीत. मात्र भाजपविरोधात शक्ती एकत्र करण्याची आमची भूमिका आहे. संविधान, लोकशाही टिकविण्यासाठी भाजपविरोधी पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहनही आ. जयंत पाटील यांनी केले.
अपेक्षित नसलेली राजकीय परिस्थिती आज ओढावली आहे. आज प्रागतिक पक्षातील घटक पक्षातील नेत्यांनी न्यायासाठी एकनिष्ठता ठेवली आणि म्हणूनच आज त्यांचे नाव अभिमानाने घेतले जात आहे, याचा अभिमान आहे.
आ. जयंत पाटील, शेकाप सरचिटणीस