एकहाती सत्ता आणण्यात शरद पवार अपयशी

वळसे पाटील टीकेवर ठाम

| मुंबई | प्रतिनिधी |

शरद पवार हे महाराष्ट्राचे उत्तुंग नेते असले तरी त्यांना एकहाती सत्ता आणता आली नसल्याचे वक्तव्य सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. आपल्या वक्तव्यावर वळसे पाटील ठाम राहिले. इतकंच नाही तर अजित पवार गटानेदेखील वळसे पाटील यांची पाठराखण केली.

मी शरद पवारांविषयी असे उद्गार काढलेले नाहीत. माझं म्हणणं असं होतं की गेली 40 ते 50 वर्षे शरद पवारांनी या राज्यासाठी, देशासाठी काम केलं आहे. देशात अनेक प्रादेशिक पक्ष आहेत. त्यातले अनेक पक्ष स्वतःच्या हिंमतीवर बहुमत मिळवून सत्तेवर बसले आहेत. मात्र महाराष्ट्रातल्या जनतेने अशी शक्ती शरद पवार यांच्या मागे उभी केली नाही याची मला खंत आहे. मी खंत व्यक्त करत होतो, त्यात शरद पवारांना कमी लेखण्याचा किंना काही चुकीचं बोलण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले.

अजित पवार गटाकडून समर्थन
शरद पवारांच्या राजकीय सामर्थ्याबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांच्यावर टीकेची झोड उठू लागली. मात्र, अजित पवार गटाने आपल्या नेत्याच्या वक्तव्याचे समर्थन केले. दिलीप वळसे पाटील यांनी गैरसमजाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. विधानाबद्दल नाही. विधानावर ते ठाम आहेत. शरद पवार यांना महाराष्ट्रात एकमुखाने पाठिंबा मिळून आजपर्यंत बहुमताने सत्ता स्थापन करता आलेली नाही. त्यामागच्या कारणांची चर्चा आजही अनुत्तरीत असल्याचे ट्वीट अजित पवार गटांकडून करण्यात आले आहे. त्याशिवाय, बंडापूर्वी राष्ट्रवादीच्या एका कार्यक्रमात अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याची क्लिपही ट्वीट करण्यात आली आहे.

Exit mobile version