। बीड । प्रतिनिधी ।
राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघातील काही अपवाद वगळता जवळ जवळ सर्वच मतदारसंघात सकाळपासूनच मतदारांनी गर्दी केल्याचे चित्र होते. तर बहुतांश ठिकाणी शांततेत मतदान सुरू असताना काही ठिकाणी काही किरकोळ वाद झाल्याचेही प्रकरण पुढे आले. यामध्ये परळी विधानसभा मतदारसंघांमध्ये बोगस मतदान होत असल्याची तक्रार शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी केली आहे. याच दरम्यान परळी शहरातील बँक कॉलनी परिसरामध्ये असलेल्या मतदान केंद्रावर उमेदवार मतदान केंद्रातील माहिती घेत असताना अॅड. माधव जाधव यांना तीन ते चार जणांनी मारहाण केली असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये मतदान केंद्राबाहेर उभे असताना अॅड. माधव जाधव यांच्यावर हल्ला करण्यात आला. जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आहेत. दरम्यान या प्रकरणामुळे परळी विधानसभा मतदारसंघांमध्ये काहीसा तणाव निर्माण झाला होता.
मारहाण झाल्यानंतर मतदान केंद्राची तोडफोड
राष्ट्रवादीचे नेते माधव जाधव यांना परळीमध्ये मारहाण झाल्यानंतर त्याचा पडसाद परळी विधानसभा मतदारसंघातील घाटनांदुर या ठिकाणी दिसला. घटनांदूरमधील मतदान केंद्रामध्ये मतदान चालू असतानाच काही कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रात घुसून मतदान केंद्र फोडल्याची घटना घडली. काही काळ यामुळे या ठिकाणचे मतदान थांबवण्यात आले होते.