84 वर्षांचा योद्धा पुन्हा लढाईत
। मुंबई । प्रतिनिधी ।
बारामती लोकसभेच्या लढाईसाठी सर्व शक्ती पणाला लावून लढणार्या शरद पवार यांना रविवारी प्रचंड थकवा आला होता. त्यामुळे त्यांना एक दिवस विश्रांती घ्यावी लागली होती. या विश्रांतीनंतर शरद पवार पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सज्ज झाले आहेत. येत्या तीन दिवसांमध्ये शरद पवार हे पूर्वीप्रमाणेच दौरे, सभा आणि बैठका घेणार आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये प्रचंड धावपळ झाल्याने शरद पवार यांची प्रकृती रविवारी चांगलीच बिघडली होती. त्यामुळे शरद पवार हे नव्या दमाने प्रचाराला सुरुवात करत असले तरी त्यांच्यावर कमी ताण येईल, अशाप्रकारे कार्यक्रम आणि सभांचे नियोजन करण्यात आले आहे.
शरद पवार प्रचारात पुन्हा सक्रिय झाल्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात पुन्हा एकदा चैतन्याचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांमध्ये शरद पवार यांनी अक्षरश: झंझावाती म्हणावा, असा प्रचार केला आहे. शरद पवार यांचे वय बघता ते निवडणुकीत घेत असलेली मेहनत आणि कष्ट अनेकांच्या कौतुकाचा विषय ठरत आहेत. राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या तीन टप्प्यांमध्ये शरद पवार हे प्रचारासाठी राज्यभरात पायाला अक्षरश: भिंगरी लावल्याप्रमाणे फिरले आहेत. या काळात शरद पवार यांनी 52 सभा आणि तब्बल 25 बैठका घेतल्या होत्या. या सगळ्या व्यग्र वेळापत्रकामुळे शरद पवारांना दिवसाला फक्त चार तासांची झोप मिळाली होती. याचा परिणाम शरद पवारांच्या तब्येतीवर झाला होता.
बारामती लोकसभेच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शरद पवार यांच्या घशाला इन्फेक्शन झाल्यामुळे त्यांचा आवाज पार बसला होता. त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. तरी शरद पवार यांनी भोर आणि इंदापूरमध्ये भाषण केले होते. मात्र, बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवार हे पूर्णपणे थकले होते. ही सभा सुरु असताना त्यांच्या डोळ्यांवर ग्लानी होती. या सभेत ते फार बोलूही शकले नव्हते. यानंतर डॉक्टरांनी शरद पवार यांनी आराम करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार शरद पवार हे मंगळवारी फक्त बारामतीत मतदान करण्यासाठी बाहेर पडले होते. उर्वरित वेळ त्यांनी घरी राहून आराम केला होता.