| अमरावती | वृत्तसंस्था |
विविध क्षेत्रातील गुणवत्ताधारकांच्या पाठिशी कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता पाठिशी उभं राहणारे महाराष्ट्राचे नेतृत्व म्हणजे शरद पवार आहेत. डॉ. पंजाबराव देशमुखांच्या नावाने शरद पवार यांना पुरस्कार देण्यात आल्याने पुरस्काराने आणखी मोठी उंची गाठली आहे, असे प्रशंसनीय उद्गार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काढले.
डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने 125 रुपयाचे नाणे जारी केले. त्या नाण्याचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच, माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावाचा पुरस्कार शिवाजी शिक्षण संस्थेच्यावतीने देण्यात आला. त्या कार्यक्रमात गडकरी बोलत होते.
डॉ. पंजाबराव देशमुख यांचे कृषी क्षेत्रात मोठे नाव आहे. शरद पवार यांचेही मोठे नाव आहे. पंजाबराव देशमुखांच्या नावाने शरद पवार यांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्यामुळे आता पुरस्काराने आणखी मोठी उंची गाठली आहे. पण, शरद पवार यांच्या उंचीची माणसं दरवर्षी कुठं मिळणार, असेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले. पंजाबरावांची तळमळ, व्हिजन ही शरद पवार यांच्याकडे आहे. राजकीय धुळवड सुरू असते. मात्र, या राजकीय धुळवडीत डॉ. पंजाबराव देशमुख, शरद पवार यांच्या सारख्या नेत्यांचे नाव, कार्य सामान्यांच्या कायम लक्षात राहते, असेही गडकरी म्हणाले. डॉ. पंजाबराव देशमुख यांनी शिक्षण, कृषी क्षेत्रात केलेल्या कार्याची महती सांगत सध्याच्या काळात शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्यासाठी पावले उचलण्याची आवश्यकता अधोरेखित केली.