शरद पवारांचा अजित पवारांवर पलटवार

| बारामती | प्रतिनिधी |

लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून धमक्या दिल्या जात असल्याची चर्चा सुरू असताना खुद्द शरद पवार यांनीच सुपे येथील भर सभेत ‘घड्याळाला मतदान केले नाही, तर पाणी मिळणार नाही, कारखान्याला ऊस जाणार नाही’, असा मजकूर असलेली चिठ्ठी वाचून दाखवली. ‘अशा धमक्यांना घाबरू नका, त्यांना दुरुस्त करण्याची वेळ आता आली आहे’, या शब्दात त्यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे वाभाडे काढले. कितीही धमक्या द्या, तुमच्या धमक्यांना भीक न घालणारी ही अवलाद आहे, असे शरद पवार गरजले.

शरद पवार यांनी बारामतीच्या जिरायत भागाचा दौरा केला. जनाई-शिरसाई पाणी योजनांसंबंधी शरद पवार यांनी या दौर्‍यात भाष्य केले. राष्ट्रवादीतील फुटीनंतर तालुक्यात या सिंचन योजनेवरूनच आता श्रेयवाद सुरु झाला आहे. जनाई-शिरसाई योजनेच्या कामाची जबाबदारी मी ज्यांच्यावर दिली होती, त्यांनी ती पार पाडली नाही. मी गेली 20 वर्षे स्थानिक विषयात लक्ष घालत नव्हतो. परंतु आता लक्ष घालून मी माझी जबाबदारी पार पाडेन, असे पवार यांनी स्पष्ट केले. बारामतीच्या जिरायत भागाने नेहमीच मला भरभरून प्रेम दिले आहे. त्यामुळे या माझ्या माणसांचे प्रश्‍न सोडवणे ही माझीच जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

Exit mobile version