| नाशिक | प्रतिनिधी |
अनेक जण हे राष्ट्रवादी शरद पवार गटातून अजित पवार गटात आले आहेत. त्यामुळे अनेकांच्या मनात शरद पवार यांच्याविषयी सहानुभूती असल्याने त्यांच्या सभेला गर्दी होत आहे, असे मत अजित पवार गटाचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. मत देण्याची वेळ येते तेव्हा, मतदार सहानुभूती विसरतो. देशाचे नेतृत्व कोण करू शकेल, अशा व्यक्तीला मतदान केले जाते, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.
येथे पत्रकारांशी संवाद साधताना भुजबळ यांनी, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्यासंदर्भात झालेल्या घटनेचा निषेध केला. एखाद्या उमेदवाराकडून अशी कृती होणार नाही. परंतु, उत्साही कार्यकर्त्यांकडून असा प्रकार होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. नाशिकमध्ये कोणाला घाबरुन नव्हे तर, आपल्यामुळे महायुतीचा उमेदवार ठरवण्यात अडचण येऊ नये, यासाठी माघार घेतली. स्पर्धेतून बाजूला झाल्यामुळे उमेदवाराची घोषणा लवकर होईल, असे वाटले होते. किमान 20 मे पर्यंत तरी उमेदवार जाहीर करावा, असा खोचक टोला भुजबळ यांनी महायुतीच्या नेत्यांना हाणला.
कुठल्याही समाजाचा, पक्षाचा उमेदवार असला तरी त्याला किती मते द्यायची हे लोक ठरवतील. अनेक ठिकाणी ओबीसी उमेदवार उभे आहेत. माझ्या उमेदवारी माघारीवरून काहींच्या मनात राग असला तरी, महायुती अडचणीत येईल अशी कृती करू नका, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. नाशिकमध्ये जो उमेदवार दिला जाईल, त्याला विजयी करु, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. मनोज जरांगे यांना आपण काय बोलतो ते कळत नसल्याचेही त्यांनी नमूद केले.