। मुंबई । प्रतिनिधी ।
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, देशाचे नेते शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा प्रयत्न केला होता. राजीनामा एकमतानं नामंजूर करण्यात येत आहे. त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राहावे हा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला, असं प्रफुल पटेल म्हणाले. शरद पवार यांनी आमच्या, देशातील जनतेच्या भावनेचा आदर करुन निर्णय घ्यावा, असं प्रफुल पटेल म्हणाले. दरम्यान, समितीनं शरद पवार यांचा राजीनामा फेटाळल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. दुसरीकडे शरद पवार त्यांच्या निर्णयाबाबत काय भूमिका घेतात याचा सस्पेन्स कायम आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रफुल पटेल यांनी आज मुंबई येथे पत्रकार परिषदेला संबोधित केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवड समितीच्या सदस्यांच्या बैठकीनंतर बोलताना शरद पवारांच्या घोषणेनं आम्ही स्तब्ध झालो, असं ते म्हणाले. शरद पवार असा निर्णय जाहीर करतील याची कल्पना नव्हती. त्या दिवशी सगळ्यांनी त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. चव्हाण सेंटरच्या कार्यक्रमानंतरही माझ्या सारख्या अनेक पक्षाच्या ज्येष्ठ मान्यवरांनी शरद पवार यांची भेट घेतली. आम्ही त्यांना त्या दिवसापासून सारखी विनंती करत राहिलो. देशाला, राज्याला आणि पक्षाला तुमची गरज आहे. या पक्षाचे नाव, आधारस्तंभ तुम्हीच आहात, असं त्यांना सांगितल्याचं प्रफुल पटेल म्हणाले.
शरद पवार हे देशात आणि राज्यात सन्मान असलेले नेते आहेत. देशाच्या प्रत्येक राज्यात त्यांच्या कामाचा व्याप आहे. प्रकाशसिंग बादल यांच्या अंत्यसंस्कारावेळी गेलो होतो त्यावेळी पंजाबच्या शेतकर्यांनी पवार साहेबांनी केलेल्या कामाला विसरु शकत नाही, असं सांगितलं. गेल्या दोन तीन दिवसांमध्ये देशातील विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी त्यांची भावना शरद पवार, सुप्रिया सुळे आणि माझ्याकडे व्यक्त केली, असं प्रफुल पटेल म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नव्हे, अनेक नेत्यांनी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद सोडू नये, अशी भावना बघायला मिळाली, अख्खा महाराष्ट्र आणि देशात जिथं जिथं पक्षाचा कार्यकर्ता आहे, तिथं त्यांच्या मनामध्ये दु:ख आहे, वेदना आहेत, या भावना नजरअंदाज होऊ शकत नाहीत, त्यामुळं आम्ही निर्णय मागं घेण्याची विनंती करणार असल्याचं पटेल म्हणाले.