मोदींच्या टीकेला शरद पवारांचे प्रत्युत्तर

होय, माझा आत्मा शेतकर्‍यांसाठी अस्वस्थ

| पुणे | प्रतिनिधी |

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पुण्यातील सभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख टाळत मोदींनी त्यांच्यावर भटकती आत्मा, अशी टीका केली होती. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या टीकेला आता शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर देत समाचार घेतला आहे. मंगळवारी जुन्नर येथील एका सभेत बोलताना होय, मी अस्वस्थ आहे, असा भीमटोला शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना लगावला.

पंतप्रधान मोदींचे म्हणणे खरं आहे. आत्मा अस्वस्थ आहे, पण तो स्वत:च्या स्वार्थासाठी नाही, तर शेतकर्‍यांचे दुखणे बघून अस्वस्थ आहे. आज देशात महागाई वाढली आहे, लोकांना संसार करणे कठीण झाले आहे, त्यासाठी अस्वस्थ आहे. अडचणीत असणार्‍या लोकांचे दुःख मांडणे आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणे, हे माझं कर्तव्य आहे, माझ्यावर यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आहे, असं प्रत्युत्तर शरद पवार यांनी दिले.

पुढे बोलताना त्यांनी मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवरही टीका केली. आज चांगले काम करणार्‍यांविरोधात सत्तेचा गैरवापर केला जातो आहे. लोकशाहीत प्रत्येकाला टीका करण्याचा अधिकार आहे. जर ती टीका चुकीची असेल तर तुम्हाला उत्तर देण्याचा अधिकारही आहे. मात्र, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी मोदी सरकारवर टीका केली म्हणून त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत उत्तम काम केले. त्यांनी मोदी सरकारच्या धोरणाचा विरोध केला, म्हणून त्यांनाही तुरुंगात टाकण्यात आले आहे. महाराष्ट्रात तर हुकूमशाही सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

Exit mobile version