| मुरुड जंजिरा | प्रतिनिधी |
मुरूड तालुक्यातील साठाव येथील जिंदल विद्या मंदिरातील इयत्ता पाचवीत शिकणारी विद्यार्थीनी शरण्या वाघमोडे हिने चमकदार कामगिरी केली आहे. तिने जानेवारीमध्ये आयोजित ऑनलाईन इंटरनॅशनल परफॉर्मिंग आर्ट्स कॉन्टेस्ट ॲण्ड फेस्टिव्हलमध्ये प्रथम क्रमांक पटकावून शाळेचा तसेच परिसराचा मान उंचावला आहे.
नागपूर येथील अखिल नटराजम् आंतर सांस्कृतिक संघ पॅरिस-फ्रान्स यांच्या माध्यमातून झालेल्या या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धेत शरण्याने नृत्य व नाटिकाचे उत्कृष्ट सादरीकरण, शिस्तबद्धता आणि सर्जनशील अभिव्यक्तीच्या जोरावर हा मानाचा बहुमान मिळवला. तिच्या या यशामुळे जिंदल विद्या मंदिरला आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव प्राप्त झाले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्राचार्य मुकेश ठाकूर यांनी शरण्याचे अभिनंदन करून तिच्या जिद्द, परिश्रम आणि चिकाटीचे कौतुक केले. तिने कलाक्षेत्रात सातत्याने प्रगती करत इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. एस.एम.सी. अध्यक्ष पंकज मलिक तसेच उपप्राचार्य मंगेश बामनोटे यांनीही शरण्याचे अभिनंदन करत शाळेचा गौरव वाढवल्याबद्दल तिचे कौतुक केले.
शरण्या वाघमोडेची चमकदार कामगिरी
